US Iran Airstrikes | अमेरिका-इराणमध्ये पुन्हा हवाई हल्ले 
आंतरराष्ट्रीय

US Iran Airstrikes | अमेरिका-इराणमध्ये पुन्हा हवाई हल्ले

इराणचा अमेरिकेच्या तळावर निशाणा; कुवेतने क्षेपणास्त्रे पाडली

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन/तेहरान; वृत्तसंस्था : गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये राजनैतिक चर्चा सुरू असतानाच अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा एकदा मोठे लष्करी हल्ले झाले आहेत. अमेरिकेने रविवारी इराणच्या लष्करी ठिकाणांवर बॉम्बफेक केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने सोमवारी अमेरिकेच्या लष्करी तळाला लक्ष्य केलेे. एप्रिल महिन्यापासून लागू असलेल्या तात्पुरत्या युद्धबंदी दरम्यान दोन्ही देशांकडून झालेला हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.

‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (आयआरजीसी) या इराणच्या सैन्याने सांगितले की, त्यांनी दक्षिण इराणवर हल्ला करण्यासाठी वापरल्या गेलेल्या अमेरिकन हवाई तळावर क्षेपणास्त्र डागले. इराणने तळाचे नाव जाहीर केले नसले तरी हे क्षेपणास्त्र कुवेतच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले आहे. कुवेतने सोमवारी सकाळी आपल्या हवाई हद्दीत इराणचे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले हाणून पाडले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने स्पष्ट केले की, अमेरिकन फायटर जेटस्नी इराणची हवाई संरक्षण यंत्रणा आणि दोन ड्रोन नष्ट केले आहेत.

युद्धबंदीच्या चर्चेला खीळ

कतार आणि पाकिस्तानच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमध्ये 60 दिवसांची युद्धबंदी वाढवण्याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आली होती. मात्र, नव्या हल्ल्यांमुळे या चर्चेला मोठा धक्का बसला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्रालय प्रवक्तेइस्माईल बघाई यांनी सांगितले, अमेरिकेवरील अविश्वास आणि इस्रायलला अमेरिकेचा असलेला पाठिंबा यामुळे शांतता चर्चा थांबली आहे. सध्या अण्वस्त्रांविषयी कोणतीही चर्चा सुरू नसून युद्ध थांबवणे हीच इराणची प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

थेट संघर्ष : अमेरिकेने इराणच्या किनारपट्टीवरील हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट केली, तर इराणने अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्रे डागली.

कुवेतचा सहभाग : इराणकडून अमेरिकेच्या तळाच्या दिशेने आलेली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन कुवेतने हवेतच पाडून नष्ट केली.

आर्थिक कोंडी : होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे संकट निर्माण झाले असून अमेरिकेत ट्रम्प यांच्यावर दबाव वाढला आहे.

इस्रायलची आक्रमकता : युद्धबंदीच्या प्रयत्नांदरम्यानच इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या तळांवर आणि बैरुतवर हल्ले तीव्र केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT