आंतरराष्ट्रीय

US Iran Agreement : अमेरिका-इराण करार प्रक्रिया एकून तीन टप्प्यांत राबवणार

पुढारी वृत्तसेवा

तेहरान/वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धबंदीची प्रस्तावित चौकट तीन टप्प्यांत राबवली जाणार आहे. युद्ध अधिकृतपणे समाप्त करणे, होर्मुझ सामुद्रधुनीतील संकट सोडवणे आणि व्यापक करारासाठी 30 दिवसांच्या चर्चेची प्रक्रिया सुरू करणे, असे ते टप्पे असतील.

पाकिस्तानी सूत्र आणि मध्यस्थी प्रक्रियेची माहिती असलेल्या अन्य एका सूत्राने सांगितले की, संघर्ष औपचारिकरीत्या संपवण्यासाठी एक पानाचा सामंजस्य करार जवळपास तयार आहे; मात्र दोन्ही बाजूंमध्ये त्यातही अजूनही काही मतभेद आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आशावादी सूर व्यक्त केला. ‌‘त्यांना करार करायचा आहे ते शक्य आहे,‌’ असे त्यांनी बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना सांगितले. नंतर त्यांनी ‌‘हे लवकरच संपेल,‌’ असेही म्हटले.

इराणी अधिकाऱ्यांनी साशंकता व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी तेहरान योग्यवेळी प्रतिक्रिया देईल असे म्हटले, तर खासदार इब्राहिम रेझाई यांनी या प्रस्तावाला ‌‘अमेरिकेची इच्छा सूची,‌’ असे संबोधले.

इराणच्या संसद अध्यक्ष महम्मद बाघेर कालिबाफ यांनी सोशल मीडियावर ‌‘ऑपरेशन ट्रस्ट मी ब्रो अपयशी ठरले,‌’ असे लिहीत अमेरिकेवर टीका केली आणि होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यात अपयश आल्यानंतर अमेरिकेने प्रचारयुद्ध सुरू केल्याचा आरोप केला.

प्रोजेक्ट फ्रीडम स्थगितीमागे सौदीचा नकार

मंगळवारी ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी सुरू केलेली दोन दिवसांची नौदल मोहीम ऑपरेशन प्रोजेक्ट फ्रीडम चर्चेत प्रगती होत असल्याचे सांगत स्थगित केली होती. सौदी अरेबियाने अमेरिकेला त्यांच्या तळांचा वापर करण्यास परवानगी नाकारल्यानंतर ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला. अमेरिकन लष्कराने मात्र इराणी जहाजांवरील नाकेबंदी कायम ठेवली आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडने बुधवारी एका इराणी ध्वज असलेल्या रिकाम्या टँकरवर गोळीबार करून त्याला निष्क्रिय केल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT