वॉशिंग्टन डी.सी.; वृत्तसंस्था : अमेरिकेतील शटडाऊन आता 37 दिवसांवर पोहोचले असून, हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात दीर्घकाळ चालणारे शटडाऊन ठरले आहे. यामुळे विमानसेवा आणि महत्त्वाच्या सरकारी सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. डेल्टा, युनायटेड, अमेरिकन, साऊथवेस्ट, फ्रंटियर या प्रमुख विमान कंपन्यांनी 700 हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत.
प्रवाशांना बॅकअप तिकिटे घेण्याची सूचना दिली आहे. जरी कंपन्या विनामूल्य रीकबुकिंग आणि रिफंड देत असल्या, तरी हॉटेल किंवा इतर खर्चांसाठी भरपाई मिळणार नाही. देशातील 40 प्रमुख विमानतळांवर विमानसेवा कमी करावी लागणार आहे. यामध्ये न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन विमानतळे आहेत. यामुळे दररोज सुमारे 1800 विमानांचे उड्डाण रद्द होऊ शकते आणि 2.68 लाख प्रवाशांवर परिणाम होईल. अमेरिकेतील 13,000 एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स आणि 50,000 ट्रान्सपोर्टेशन सिक्युरिटी अॅडमिनिस्ट्रेशन एजंट एक महिन्याहून अधिक काळ विनावेतन काम करत आहेत. शटडाऊन 1 ऑक्टोबरपासून सुरू आहे. याचे मूळ कारण म्हणजे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हेल्थकेअर सबसिडी वाढवण्यास नकार दिला आहे.
* 7.3 लाख कर्मचारी विनावेतन काम करत असल्याने अनेकांना घर चालवण्यासाठी कर्ज घ्यावे लागत आहे.
* 4.2 कोटी नागरिकांचे अन्नसहाय्य थांबवले.
* नॅशनल न्यूक्लियर सिक्युरिटी अॅडमिनिस्ट्रेशनने 1400 कर्मचार्यांना रजेवर पाठवले.