वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : इराणने केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातील २० हून अधिक अमेरिकन तळांचे पूर्वी सांगण्यात आल्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक नुकसान झाले आहे. यात बहरीनमधील अमेरिकेच्या नौदलाच्या एकमेव तळाचाही समावेश आहे. या भीषण पडझडीनंतर आता अमेरिकन सरकार या भागात आपल्या लष्करी उपस्थितीचा आणि सैन्य तैनातीचा नव्याने फेरविचार करत आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून ते जून महिन्यापर्यंत इराणने बहरीनमधील ‘नेव्हल सपोर्ट अॅक्टिव्हिटी’ या पश्चिम आशियातील अमेरिकेच्या एकमेव नौदल तळावर सलग हल्ले केले. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या शोधवृत्तानुसार, या हल्ल्यांमुळे तळाचे अतोनात नुकसान झाले आहे, तेे पेंटागॉनने अधिकृतपणे जाहीर केले नव्हते. उपग्रहाद्वारे मिळालेली छायाचित्रे आणि सोशल मीडियावरील व्हिडीओंवरून असे दिसून आले आहे की, अमेरिकेचे कमांड मुख्यालय, किमान डझनभर इमारती आणि दोन सॅटेलाईट कम्युनिकेशन टर्मिनल्सचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या मोठ्या हानीमुळे आता अमेरिका पश्चिम आशियातील आपली रणनीती बदलण्याच्या विचारात आहे. बहरीन तळाची पुनर्रचना करणे, कुवेत आणि सौदी अरेबियातील सैन्य कमी करणे आणि काही लष्करी तळ इराणच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्याबाहेर म्हणजेच पश्चिमेकडे हलवण्याचा विचार अमेरिकन प्रशासन करत आहे. भविष्यात हे तळ इस्रायलमध्येही हलवले जाऊ शकतात.
* पश्चिम आशियातील इराणच्या हल्ल्यांमुळे अमेरिकेच्या बहरीन नौदल तळासह २० हून अधिक लष्करी व राजनैतिक ठिकाणांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
* या मोठ्या सुरक्षेच्या त्रुटींमुळे अमेरिका आपले लष्करी तळ इराणच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्याबाहेर हलवण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे.
* बहरीनमधील हा तळ ५० वर्षांपेक्षा जुना असून, एका छोट्या अमेरिकन शहरासारखा विकसित करण्यात आला होता, जिथे सैनिकांच्या कुटुंबांना राहण्याची परवानगी होती.
* थिंक टँकच्या अहवालानुसार, पश्चिम आशियातील अमेरिकन तळांच्या एकूण नुकसानाचा खर्च ५.१ अब्ज डॉलर्सपर्यंत जाऊ शकतो.