US flight ground stop
वॉशिंग्टन : एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) यंत्रणेतील संवाद प्रणालीत निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे अमेरिकेची संपूर्ण हवाई वाहतूक गेल्या चार तासांहून अधिक काळ ठप्प झाली होती. 'फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन'ने (FAA) सुरक्षिततेच्या कारणास्तव देशभरातील सर्व विमानांची उड्डाणे तात्पुरती स्थगित केली होती. या अभूतपूर्व गोंधळाचा फटका ११ हजारांहून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना बसला असून, जगभरातील हजारो प्रवासी विविध विमानतळांवर अडकून पडले आहेत.
भारतीय वेळेनुसार आज पहाटे २.२४ वा. विभागीय हवाई वाहतूक नियंत्रण केंद्रांमध्ये संवाद यंत्रणेत बिघाड झाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एफएएने तातडीने देशव्यापी उड्डाणबंदी लागू केली. सप्टेंबर २००१ मधील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेतील हवाई वाहतुकीवर आलेली ही सर्वात मोठी बंदी ठरली आहे. याआधी जानेवारी २०२३ मध्ये 'नोटाम' प्रणालीतील बिघाडामुळे अशीच परिस्थिती उद्भवली होती.
या घटनेमुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. मात्र, अमेरिकेचे गृहसुरक्षा सचिव मार्कवेन मुलिन यांनी व्हाईट हाऊसबाहेर पत्रकारांशी बोलताना हा कोणताही सायबर किंवा दहशतवादी हल्ला नसल्याचे स्पष्ट केले. "हा दुसरा ९/११ हल्ला नाही. आकाशात असलेली सर्व विमाने सुरक्षित असून, प्रवाशांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी काळजी करण्याचे कारण नाही," असा दिलासा त्यांनी दिला. जुन्या एटीसी प्रणालीवर नवीन तंत्रज्ञानाचा ताण आल्याने आणि दूरसंचार सेवा खंडित झाल्याने हा बिघाड झाल्याचे त्यांनी सांगितले.
'फ्लाइटअवेअर' या संस्थेच्या आकडेवारीनुसार, या बिघाडामुळे सुमारे १० हजार विमानांना उशीर झाला, तर १ हजारांहून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली. उड्डाणबंदीच्या काळात आकाशात असलेल्या विमानांना त्यांच्या नियोजित स्थळी उतरण्याची परवानगी देण्यात आली, मात्र जमिनीवरील विमानांना उड्डाणास मज्जाव करण्यात आला. परिणामी, ८२७ विमानांचे मार्ग बदलण्यात आले. यातील ६७० विमाने मूळ विमानतळावर परत पाठवण्यात आली, तर १५७ विमाने वॉशिंग्टन डलेस, लॉस एंजेलिस, सिनसिनाटी आणि नॅशव्हिल विमानतळांवर उतरवण्यात आली. सीएनएनच्या वृत्तानुसार, एकाच वेळी अनेक विमाने वळवण्यात आल्याने अनेक विमानतळांवर विमाने उभी करण्यासाठी जागा अपुरी पडू लागली होती.
तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर एफएएने ही उड्डाणबंदी मागे घेतली आहे. अमेरिकन एअरलाइन्स आणि युनायटेड एअरलाइन्सने सेवा पूर्ववत करण्यास सुरुवात केली असली, तरी संपूर्ण हवाई वाहतूक सुरळीत होण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या परिस्थितीमुळे अमेरिकेतून येणाऱ्या आणि तिथे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्याबाबत एअर इंडियाने एक सूचना जारी केली आहे. "अमेरिकेतील विमान वाहतूक कामकाजावर परिणाम करणाऱ्या दळणवळण यंत्रणेतील बिघाडामुळे, संपूर्ण देशात विमानांचे उड्डाण थांबवण्यात आले आहे. याचा परिणाम अमेरिकेतील विमानतळांवरून होणाऱ्या उड्डाणांवर झाला असून, एअर इंडियाच्या अमेरिकेला जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या विमान सेवांमध्येही व्यत्यय येऊ शकतो. प्रवाशांना सल्ला देण्यात येत आहे की, त्यांनी आपल्या विमानांची सद्यस्थिती तपासावी आणि त्यानुसार विमानतळावर जाण्याचे नियोजन करावे."