Donald Trump | शांतता चर्चा होईपर्यंत अमेरिकेने युद्धविराम वाढवला; ‘होर्मुझ’ची नाकाबंदी कायम 
आंतरराष्ट्रीय

Donald Trump | शांतता चर्चा होईपर्यंत अमेरिकेने युद्धविराम वाढवला; ‘होर्मुझ’ची नाकाबंदी कायम

नाकाबंदी उठवल्याशिवाय चर्चा नाही; इराणही ठाम

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : शांतता चर्चा होईपर्यंत इराणसोबतचा युद्धविराम वाढवण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी केली. पुढील शांतता चर्चांना वेळ मिळावा, हा त्यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या निर्णयाला इराण किंवा अमेरिकेचा सहयोगी असलेला इस्रायल मान्यता देईल की नाही, याबाबत बुधवारपर्यंत स्पष्टता नव्हती. अमेरिकेने युद्धविराम वाढवला असला, तरी त्यांनी होर्मुझ सामुद्रधुनीची नाकाबंदी कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर इराणने नाकाबंदी उठवणे, गोठवलेली मालमत्ता खुली करणे, या मागण्या मान्य होणार असतील तरच शांतता चर्चांत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले. इराणने युद्धविराम संपण्याच्या घोषणेनंतर तीन जहाजे जप्त केली असून, त्यात एका भारतीय जहाजाचा समावेश आहे.

पाकिस्तानच्या मध्यस्थांनी केलेल्या विनंतीनुसार, जोपर्यंत इराणचे नेते आणि प्रतिनिधी एकसंध प्रस्ताव सादर करत नाहीत आणि चर्चा कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचत नाहीत, तोपर्यंत अमेरिका इराणवरील हल्ला थांबवून ठेवेल, असे त्यांनी स्पष्ट केले. इराणकडून या घोषणेवर तत्काळ प्रतिक्रिया आली नाही. मात्र, तेहरानमधील सुरुवातीच्या प्रतिक्रिया पाहता, ट्रम्प यांच्या वक्तव्यांकडे संशयाने पाहिले जात असल्याचे इराणी माध्यमांनी म्हटले आहे. ‘तस्नीम न्यूज एजन्सी’ने म्हटले की, इराणने युद्धविराम वाढवण्याची मागणी केलेली नाही.

आधी नाकाबंदी हटवा ः इराण

कोणत्याही पुढील युद्धविराम चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये जाण्यापूर्वी अमेरिकेने इराणवरील नाकेबंदी संपवणे आवश्यक आहे, असे इजिप्तमधील इराणी मोहिमेचे प्रमुख मोज्तबा फर्दोसी पूर यांनी सांगितले. ते म्हणाले, इराणच्या अटींची अंमलबजावणी करण्यासाठी पाकिस्तानी मध्यस्थांसोबत संवाद सुरू आहे. धमक्यांच्या छायेखाली आम्ही चर्चा करणार नाही. नाकेबंदी उठविल्याशिवाय आम्ही इस्लामाबादला जाणार नाही. युद्धविरामाचा वापर करून इस्लामिक रिपब्लिकविरुद्ध लष्करी कारवाई पुन्हा सुरू करण्यासाठी अधिक सैन्य शक्ती उभारली जात आहे, असा आरोप इराणने केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT