वॉशिंग्टन : अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये १४ जूनला झालेल्या अमेरिकी सैन्य परेडमध्ये पाहुणे म्हणून पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख असीम मुनीर यांना बोलविण्यात आले होते; परंतु व्हाईट हाऊसने आम्ही त्यांना निमंत्रितच केलेले नसल्याचे जाहीर केल्याने पाकचा पर्दाफाश झाला आहे. वॉशिंग्टनमधील ही परेड अमेरिकन सशस्त्र दलांच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केली गेली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ७९ वा वाढदिवसदेखील याच दिवशी झाला.
भारत-पाकिस्तान हवाई संघर्षानंतर पाकिस्तानने लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना फील्ड मार्शल केले होते. एकही युद्ध न जिंकलेल्या देशाचा हा लष्करप्रमुख काय म्हणून अमेरिकेच्या लष्करी परेडमध्ये निमंत्रित आहे, हेदेखील जगाला पडलेले एक कोडेच होते. आता मात्र पाकिस्तानने उठविलेल्या या अफवाच असल्याचे समोर आले आहे. असीम मुनीर यांना अमेरिकेत आमंत्रित केल्याच्या वृत्ताचे व्हाईट हाऊसने खंडन केले आहे.
व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने असीम मुनीर यांना लष्करी समारंभात सन्माननीय पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. या परेडसाठी अमेरिकेने कोणत्याही परदेशी लष्करी अधिकाऱ्याला आमंत्रित केलेले नाही. हे वृत्त खोटे आहे, असे या अधिका-याने म्हटले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या वाढदिवसानिमित्त अमेरिकेच्या लष्कर दिन सोहळ्यासाठी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना निमंत्रित केल्याबद्दल जोरदार टीका केली आहे. रमेश यांनी म्हटले आहे की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यांपूर्वी ज्या व्यक्तीने इतकी प्रक्षोभक आणि चिथावणीखोर भाषा वापरली होती, तीच ही व्यक्ती आहे. अमेरिकेच्या मनात नक्की चाललंय काय, असा सवाल करीत रमेश यांनी केला.