US envoy Pakistan visit cancelled | अमेरिकी दूतांचा पाक दौरा रद्द; ट्रम्प यांच्या आडमुठेपणामुळे अमेरिका-इराण चर्चा बारगळणार? 
आंतरराष्ट्रीय

US envoy Pakistan visit cancelled | अमेरिकी दूतांचा पाक दौरा रद्द; ट्रम्प यांच्या आडमुठेपणामुळे अमेरिका-इराण चर्चा बारगळणार?

पुढारी वृत्तसेवा

अनिल टाकळकर

वॉशिंग्टन डी सी : इराण शांतता चर्चेसाठी पाकिस्तानला जाणार्‍या अमेरिकेचे प्रतिनिधी जॅरेड कुशनर आणि स्टीव्ह विटकॉफ यांचा पाकिस्तानचा दौरा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयत्या वेळी रद्द केला असून त्यामुळे इराण अजूनही चर्चेसाठी आपल्या अटी मान्य होत नसल्याने राजी होत नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शांतता चर्चा बारगळण्याची भीती व्यक्त होत आहे. ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुशनर आणि विशेष दूत विटकॉफ पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आज इस्लामाबादला रवाना होणार होते. पण त्यांचा हा दौरा रद्द करत असल्याचे ट्रम्प यांनी ‘फॉक्स न्यूज’शी बोलताना सांगितले. अमेरिकेचे प्रतिनिधी पाकिस्तानमध्ये इराणी प्रतिनिधींशी भेटून चर्चा कारणार होते.

दरम्यान, इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी इस्लामाबादला भेट देऊन तिथे त्यांनी पाकिस्तानच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर ते आपल्या राजनैतिक दौर्‍याचा भाग म्हणून ओमानला रवाना झाले. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हा दौरा रद्द केला असावा, असे मानले जाते. ट्रम्प यासंबंधात म्हणाले, सर्व हुकमाचे पत्ते आमच्याकडे आहेत. त्यांना हवे असेल तेव्हा ते आम्हाला फोन करू शकतात. पण काहीही निष्पन्न न होणार्‍या चर्चांसाठी आमचे प्रतिनिधी पुन्हा 18 तासांचे उड्डाण करून तिथे बसणार नाहीत. पाकिस्तानमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या आमच्या प्रतिनिधींना मी हे काही वेळेपूर्वी सांगितले.

युद्ध समाप्त करण्यासाठी दोन्ही बाजूंमध्ये नजीकच्या काळात कोणताही करार होण्याची शक्यता कमी असल्याचे हे संकेत मानले जात आहेत. इराणने आपला अणुसाठा अमेरिकेकडे सुपूर्द करावा किंवा आपला अणुकार्यक्रम मर्यादित करावा यासह प्रशासनाची राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यात अमेरिकेला अजूनही यश आलेले दिसत नाही.

अवास्तव अटी इराणला अमान्य

इराणने स्पष्ट केले आहे की, ते अमेरिकेसोबत थेट चर्चेच्या नव्या फेरीस तयार नाहीत. एका इराणी राजनैतिक सूत्राने सांगितले की, अमेरिकेच्या अवास्तव मागण्या इराण मान्य करणार नाही. तसेच अमेरिकेच्या अटीनुसार चर्चा होणार नाही. अराघची यांनीही सांगितले की, युद्धविराम टिकवून ठेवणे आणि इराणवर लादलेले युद्ध पूर्णपणे संपवणे, हीच तेहरानची भूमिका आहे. व्हाईट हाऊसच्या आधीच्या घोषणेनुसार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे दोन प्रमुख सल्लागार स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर शनिवारी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादकडे रवाना होणार होते. मात्र संभाव्य करारासंदर्भातील चर्चेची स्थिती अत्यंत अनिश्चित दिसत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT