पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या (House of Representatives) निवडणुकीत मूळ भारतीय वंशाच्या सहा उमेदवारांनी विजय मिळवला आहे. यामुळे सध्याच्या अमेरिकी काँग्रेसच्या सभागृहातील त्यांची संख्या पाच वरून वाढून सहा झाली आहे.
वर्जिनियामध्ये भारतीय-अमेरिकन वकील सुहास सुब्रमण्यम (Suhas Subramanyam) यांनी इतिहास रचला आहे. राज्यातून तसेच संपूर्ण पूर्व किनारी पट्ट्यातून निवडून येणारे ते पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती ठरले आहेत. सुब्रमण्यम सध्या वर्जिनिया राज्याचे सिनेटर आहेत. सुब्रमण्यन यांनी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या माईक क्लॅन्सी यांचा पराभव केला.
"हा माझा सन्मान आहे की वर्जिनियाच्या १० व्या डिस्ट्रिक्टमधील लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला. हा जिल्हा माझे घर आहे. येथेच माझे लग्न झाले आहे. मी आणि माझी पत्नी मिरांडा आणि आमच्या मुली आम्ही सर्व येथेच आहोत. आमच्या समुदायाच्या समस्या आमच्या कुटुंबासाठी वैयक्तिक आहेत. या जिल्ह्याची सेवा करत राहणे ही एक सन्मानाची गोष्ट आहे," अशी भावना सुब्रमण्यम यांनी X वरील पोस्टमधून व्यक्त केली आहे.
ॲरिझोनाच्या फर्स्ट काँग्रेसनल डिस्ट्रिक्टमध्ये रिपब्लिकन रिपब्लिकनच्या उमेदवारांविरोधात अमिश शाह विजयी होण्याची शक्यता आहे. यामुळे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये भारतीय अमेरिकन प्रतिनिधींची संख्या वाढू शकते.
सुब्रमण्यम यांनी याआधी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात व्हाईट हाऊसचे सल्लागार म्हणून काम केले होते. ते अमेरिकेतील भारतीय-अमेरिकन समुदायात लोकप्रिय आहेत. अमी बेरा, राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना, प्रमिला जयपाल आणि श्री ठाणेदार या पाच भारतीय अमेरिककन यांच्या 'समोसा कॉकस' गटात ते सामील झाले आहेत. अमेरिकेतील मूळ भारतीय वंशाच्या प्रतिनिधींच्या गटाला 'सामोसा कॉकस' (Samosa Caucus)असे म्हटले जाते. सर्व पाच विद्यमान भारतीय- अमेरिकन सदस्यदेखील हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये पुन्हा निवडून आले आहेत.
मिशिगनच्या १३व्या काँग्रेसनल डिस्ट्रिक्टमधून मराठमोळे श्री ठाणेदार (Shri Thanedar) सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. राजा कृष्णमूर्ती सलग पाचव्यांदा इलिनॉयच्या डिस्ट्रिक्टमधून विजयी झाले आहेत.