पुढारी ऑनलाईन डेस्क: trump zelensky meeting | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्यात ओव्हल कार्यालयामध्ये शुक्रवारी (दि. २८ फेब्रुवारी) खडाजंगी झाली. यावेळी ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. हा वादग्रस्त सामना थेट प्रक्षेपित केला गेला आणि आधुनिक काळातील ओव्हल ऑफिसमधील अशाप्रकारचा हा एकमेव प्रसंग ठरल आहे. या वादावरून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी माफी मागावी अशी मागणी केल्याचे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे.
शुक्रवारी झेलेन्स्की यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्रपती व्हान्स यांच्याशी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर रुबियो यांनी हे वक्तव्य केले आले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर युक्रेन-अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.
ट्रम्प आणि व्हेन्स यांनी युक्रेनला दिलेल्या अमेरिकेच्या मदतीबद्दल झेलेन्स्की यांनी पुरेशी कृतज्ञता व्यक्त केली नाही, असा आरोप केला. त्यांच्या इच्छेनुसार शांतता करार मान्य करण्यासाठी दबाव टाकला. या चर्चेदरम्यान आवाज चढले, तणाव वाढला आणि ट्रम्प यांनी थेट धमकी दिली की, जर झेलेन्स्की यांनी त्यांचा प्रस्ताव मान्य केला नाही, तर अमेरिका युक्रेनला पूर्णतः सोडून देईल. झेलेन्स्की यांना मध्येच थांबवत व्हेन्स म्हणाले की, ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांसमोर स्वतःची बाजू मांडणे हा अनादर आहे. त्यांनी ट्रम्प यांचे नेतृत्व मान्य करून त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्याचवेळी ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना सांगितले, तुमची परिस्थिती चांगली नाही आणि तुम्ही तिसर्या महायुद्धासोबत जुगार खेळत आहात.
काही मिनिटांनंतर ट्रम्प यांनी उर्वरित भेटच रद्द करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की शांततेसाठी तयार नाहीत; कारण त्यांना वाटते की, अमेरिकेच्या सहभागामुळे त्यांना वाटाघाटींमध्ये मोठा फायदा मिळतो. ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडियावर लिहिले, मला कोणालाही फायदा द्यायचा नाही, मला शांतता हवी आहे. त्यांनी ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकेचा अनादर केला. ते जेव्हा शांततेसाठी तयार असतील, तेव्हा परत येऊ शकतात. यानंतर, झेलेन्स्की काही वेळातच काळ्या एसयूव्हीमधून व्हाईट हाऊस सोडून गेले.