Donald Trump  file photo
आंतरराष्ट्रीय

US Birthright Citizenship Ban : अमेरिकेतील ‘बर्थराईट सिटिझनशिप’वरील बंदीला स्‍थगिती, ट्रम्प यांना कोर्टाचा पुन्हा दणका

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्‍टन : अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना आपोआप मिळणारे नागरिकत्व मर्यादित करण्याच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांना पुन्हा न्यायालयाने दणका दिला आहे. मॅरिलँडमधील फेडरल न्यायाधीश डेबोरा बोर्डमन यांनी ट्रम्प सरकारच्या नव्या कार्यकारी आदेशाच्या अंमलबजावणीला प्राथमिक स्वरूपात स्थगिती दिली आहे. यापूर्वीही ट्रम्प यांनी असाच केलेला प्रयत्न अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता.

‘बर्थ टूरिझम’ला आळा घालण्‍याच्‍या दृष्‍टीने ट्रम्प यांनी ६ ऑगस्ट रोजी आदेश जारी केला होता. पर्यटक किंवा तात्पुरत्या व्हिसावर अमेरिकेत येऊन केवळ बाळाला जन्म देणाऱ्या महिलांच्या मुलांना जन्मत:च अमेरिकन नागरिकत्व मिळू नये, अशी तरतूद या आदेशात करण्यात आली होती. मात्र, न्या. डेबोरा बोर्डमन यांनी हा आदेश ‘जवळपास निश्चितपणे असंवैधानिक’ असल्याचे म्हटले. अमेरिकेच्या संविधानातील चौदाव्या दुरुस्तीनुसार, अमेरिकेच्या भूमीवर जन्मलेल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला नागरिकत्व मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांनी यापूर्वीही जन्माधारित नागरिकत्व मर्यादित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कनिष्ठ न्यायालयांनंतर सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्या आदेशाला ‘खो’ दिला होता. आता पुन्‍हा तसेच घडल्‍याने इमिग्रेशन धोरण कडक करण्याच्या ट्रम्प यांच्या मोहिमेला हा आणखी एक कायदेशीर धक्का मानला जात आहे.

जन्माच्या आधारावर मिळणारे नागरिकत्व मर्यादित करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न हा अमेरिकेतील स्थलांतरितांची संख्या कमी करण्याच्या मोठ्या मोहिमेचा भाग आहे. या मोहिमेत वैध कागदपत्रे नसलेल्या लाखो स्थलांतरितांना अमेरिकेतून बाहेर काढण्‍यासह एक डझनपेक्षा जास्त देशांतील नागरिकांना देशातून हद्दपारीपासून मिळालेले कायदेशीर संरक्षण काढून घेणे यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT