अमेरिकेत वाहनांतील चिनी सॉफ्टवेअर, हार्डवेअरवर बंदी. Pudlhari File Photo
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेत वाहनांतील चिनी सॉफ्टवेअर, हार्डवेअरवर बंदी

पुढारी वृत्तसेवा
अनिल टाकळकर

वॉशिंग्टन डीसी : राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेच्या वाणिज्य खात्याने अमेरिकन रस्त्यांवर धावणार्‍या कनेक्टेड वाहनांमध्ये प्रमुख चिनी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरवर बंदी घालण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यामुळे जवळजवळ सर्व चिनी कार अमेरिकन बाजारपेठेतून हद्दपार होणार , हे स्पष्ट आहे . नियोजित निर्बंधामुळे अमेरिकन आणि इतर प्रमुख वाहन निर्मात्यांना या देशांमधील वाहनांमधून प्रमुख चिनी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर काढून टाकणे भाग पडेल.

कनेक्टेड वाहनांद्वारे अमेरिकेतील ड्रायव्हर्सबद्दलचा तसेच पायाभूत सुविधांबद्दलचा जो डेटा चिनी कंपन्या गोळा करीत आहेत, त्याबद्दल बायडेन प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. इंटरनेट आणि नेव्हिगेशन व्यवस्थेशी कनेक्ट केलेल्या वाहनांमुळे हा डेटा जमा करणे त्यांना सोपे जाते. विदेशी स्तरावर ही माहिती जाणे धोक्याचे आहे. या माहितीच्या आधारे एखाद्याची खासगी माहिती गोळा करता येणार आहे शिवाय अमेरिकेतील एखादे इलेक्ट्रिक ग्रीडदेखील बंद करण्याची खेळी केली जाऊ शकते. व्हाईट हाऊसने फेब्रुवारीमध्येच या संभाव्य धोक्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्या चौकशीचे आदेश दिले होते.

वॉशिंग्टनमधील चिनी दूतावासाने चिनी वाहन निर्यात मर्यादित करण्याच्या नियोजित कृतीवर गेल्या महिन्यात टीका केली होती. अमेरिकेने बाजारपेठेची तत्त्वे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांचे प्रामाणिकपणे पालन करावे आणि सर्व देशांतील कंपन्यांसाठी समान स्पर्धा क्षेत्र तयार करावे, असे आवाहन केले होते. चीन आपल्या कायदेशीर हक्कांचे आणि हिताचे रक्षण करेल, असा निर्धारही या देशाने व्यक्त केला. अमेरिकेच्या या नियोजित निर्बंधाच्या प्रस्तावात 2027 मॉडेल वर्षाचा सॉफ्टवेअर प्रतिबंधासाठी निकष गृहीत धरला आहे. हार्डवेअर बंदीसाठी 2030 मॉडेल वर्ष किंवा जानेवारी 2029 वर्ष हा निकष निश्चित केला आहे.

नागरिकांच्या हरकतींसाठी 30 दिवसांची मुदत

या निर्बधांबाबत नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविण्यासाठी 30 दिवसांची मुदत असून त्यानंतर बायडेन प्रशासनाच्या अंतिम टप्प्यात याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल. अमेरिकेत आपल्या कार स्पर्धेचा भाग म्हणून प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत अत्यंत कमी दरात चीनकडून विकल्या जात आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT