दमास्कस; वृत्तसंस्था : अमेरिकेने सीरियातील इस्लामिक स्टेटचे दहशतवादी आणि त्यांच्या शस्त्रास्त्रांच्या तळांना लक्ष्य करून मोठी लष्करी कारवाई केली आहे. अमेरिकन प्रशासनाने या मोहिमेची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका हल्ल्यात दोन अमेरिकन सैनिक आणि एक नागरिक इंटरप्रेटर (दुभाषी) मारले गेले होते. त्याचा बदला म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, सीरियाकडून करण्यात आलेल्या ‘शूर अमेरिकन देशभक्तांच्या क्रूर हत्येचा बदला’ म्हणून हा प्रतिहल्ला करण्यात आला आहे. 13 डिसेंबर रोजी दहशतवाद्यांनी अमेरिकन आणि सीरियाई सुरक्षा दलांच्या ताफ्यावर हल्ला केला होता.
जीवितहानी : या हल्ल्यात दोन अमेरिकन सैनिक आणि एका नागरिक इंटरप्रेटरचा मृत्यू झाला, तर तीन सैनिक जखमी झाले होते.
ऑपरेशन हॉकआय स्ट्राईक
अमेरिकन लष्कराने या मोहिमेला ऑपरेशन हॉकआय स्ट्राईक असे नाव दिले आहे. मध्य सीरियातील शी संबंधित सुमारे 70 पायाभूत सुविधा आणि शस्त्रास्त्रांच्या तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. संरक्षणमंत्र्यांची प्रतिक्रिया : अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, ‘ही कोणत्याही युद्धाची सुरुवात नसून, हा एक बदला आहे.’ राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका आपल्या लोकांच्या रक्षणासाठी कधीही मागे हटणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.