US attack Iran File Photo
आंतरराष्ट्रीय

US attack Iran: अमेरिकेचा इराणवर गुप्त लष्करी हल्ला; केशम बेटावर मोठा स्फोट, अणुयुद्धाची शक्यता

अमेरिका आणि इराणमधील तणाव आता टोकाला गेला असून अमेरिकेने इराणवर मोठा लष्करी हल्ला केला आहे.

मोहन कारंडे

वॉशिंग्टन: अमेरिका आणि इराणमधील तणाव आता टोकाला गेला असून अमेरिकेने इराणवर मोठा लष्करी हल्ला केला आहे. एका बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणसोबत समझोता होण्याचे संकेत देत असतानाच, मंगळवारी सकाळी अमेरिकेने इराणच्या केशम बेटावर हा गुप्त हवाई हल्ला केल्याने आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पश्चिम आशियातील संघर्ष अधिकच हिंसक बनला असून, अणू युद्धाचा धोकाही वाढल्याची भीती वर्तवली जात आहे.

गुप्त कारवाई आणि ट्रम्प यांची खेळी

'वॉल स्ट्रीट जर्नल'ने अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, हा हल्ला अत्यंत गुप्त पद्धतीने पार पाडला गेला. युद्धाची पूर्वकल्पना मिळू नये आणि कोणतीही चाहूल लागू नये, यासाठी अमेरिकेने ही रणनीती आखल्याचे बोलले जात आहे. हल्ल्यानंतर केशम बेटावर अनेक मोठे स्फोट झाले. ट्रम्प यांनी नुकताच इराणसोबत समझोता होण्याचा दावा केला होता, त्यामुळे या हल्ल्याला ट्रम्प यांची खेळी म्हणून पाहिले जात आहे.

या हल्ल्याच्या बरोबर एक दिवस आधी, म्हणजेच सोमवारी, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रूथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली होती. कच्चे तेलाच्या किमतीत प्रति बॅरल १० डॉलरची घसरण झाल्याचे सांगत, इराण युद्धास इच्छुक नसून लवकरच समझोता करू इच्छितो, असा दावा त्यांनी केला होता. तसेच, मंगळवारी होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांनंतर इराणवर नवीन हल्ले करणार का, असा प्रश्न विचारला असता, ट्रम्प यांनी स्पष्टपणे "नाही" असे उत्तर देत हल्ल्याची शक्यता फेटाळून लावली होती. मात्र, अवघ्या काही तासांतच या हल्ल्याची बातमी समोर आल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका

केशम बेटावरील हल्ल्यानंतर जागतिक बाजारात त्याचे तत्काळ तीव्र उमटत उमटले असून कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा भडकल्या आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेला हा संघर्ष आता आणखी वाढत आहे. पश्चिम आशियातून होणाऱ्या खनिज तेलाच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण होण्याच्या चिंतेने व्यापारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात 'ब्रेंट क्रूड फ्युचर्स' ४८ सेंटने वधारून १०५.२५ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले, तर 'यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड' (WTI) देखील उसळी घेऊन ९६.९३ डॉलर प्रति बॅरलवर जाऊन पोहोचला आहे. या घडामोडींमुळे जागतिक अर्थकारणावर आणि इंधन दरवाढीवर गंभीर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT