Monaco  Pudhari
आंतरराष्ट्रीय

Ultra-rich destinations | जगभरातील अब्जाधीशांचा 'या' देशाकडे ओघ का वाढतोय? याच देशाला का मिळतेय एवढी पसंती? जाणून घ्या...

Ultra-rich destinations | वास्तव्य तसेच स्थलांतरासाठी जगभरातील अब्जाधीश पहिली पसंती म्हणून या देशाकडे पाहत आहेत.

Akshay Nirmale

why rich move to Monaco tax haven countries ultra-rich destinations

ऑनलाईन डेस्क : मोनॅको हा भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील लहानसा पण अतिशय श्रीमंत देश सध्या जगभरातील अब्जाधीश आणि कोट्यधीशांना जबरदस्त आकर्षित करत आहे.

करमुक्त जीवनशैली, लक्झरी रिअल इस्टेट आणि राजकीय स्थिरता यामुळे मोनॅको हे जगातील सर्वात लोकप्रिय 'टॅक्स हेवन' ठिकाणांपैकी एक बनले आहे.

आजघडीला या देशातील प्रत्येक तिसरा नागरिक कोट्यधीश आहे. केवळ सौंदर्याने नव्हे तर आर्थिक दृष्टिकोनातूनही जागतिक श्रीमंतांच्या यादीत हा देश वरचढ ठरत आहे.

श्रीमंत व्यक्तींना मोनॅको इतकं का आकर्षित करत आहे?, तेथील करसवलती, निवासाच्या अटी याविषयी जाणून घेऊया...

‘मोनाको’ — नावातच खासियत

‘मोनाको’ हे नाव ग्रीक शब्द ‘Monokos’ वरून आलं आहे. ज्याचा अर्थ आहे “एकमेव” किंवा “अद्वितीय”. हे नाव अगदी समर्पक ठरतं कारण मोनॅकोमध्ये जगातल्या कुठल्याही ठिकाणापेक्षा प्रती चौरस मीटर अधिक कोट्यधीश राहतात.

भूमध्य समुद्रकिनाऱ्याच्या रम्य लोकेशनवर वसलेला हा छोटा परंतु आलिशान देश आहे. लक्झरी जीवनशैली आणि सवलतींच्या कर कायद्यांमुळे मोनॅको जगभरातील कोट्यधीशांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.

प्रत्येक वळणावर श्रीमंती

मोनॅकोचा सूर्यप्रकाशात न्हालेला हार्बर म्हणजे महागड्या नौकांचा जणू महोत्सवच भासतो. रस्त्यांवर फेरफार करणाऱ्या लॅम्बोर्गिनी, रोल्स-रॉईस आणि इतर सुपरकार्ससह, इथं प्रत्येक कोपऱ्यात श्रीमंतीचं दर्शन घडतं.

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लहान देश असूनही (पहिला व्हॅटिकन सिटी), मोनॅकोचा GDP प्रति व्यक्ति 2,56,580 डॉलर आहे. जो जगातील बहुतांश देशांपेक्षा जास्त आहे.

तुलनेसाठी सांगायचं झालं तर, अमेरिकेचा GDP प्रति व्यक्ति 82,769 डॉलर आहे. मोनॅकोमध्ये दर तीन व्यक्तींमागे एक कोट्यधीश असल्याचे सांगितले जाते.

कर सवलतींमुळे आकर्षण

मोनॅकोमध्ये राहणाऱ्या श्रीमंत लोकांना सर्वात मोठं आकर्षण वाटते ते म्हणजे त्याचे करविषय़क सवलतीचे कायदे. तज्ज्ञांच्या मते "मोनॅकोमध्ये वैयक्तिक उत्पन्नावर कर नाही, विशेष करारामुळे फ्रेंच नागरिक वगळता इतर नागरिकांसाठी ही सुविधा आहे. याशिवाय संपत्ती कर, भांडवली नफा करसुद्धा येथे नाहीत.

वारसा हस्तांतर किंवा भेटवस्तूच्या स्वरूपात देण्यात येणाऱ्या संपत्तीवरही फारसा कर लागत नाही. पती-पत्नी आणि मुलांना कोणताही वारसा कर नाही, तर इतरांना जास्तीत जास्त 16 टक्के कर भरावा लागतो.

करमुक्त धोरणामागचा इतिहास

1869 साली प्रिन्स चार्ल्स III यांनी मोन्टे कार्लो कॅसिनोची स्थापना केली आणि त्याचवेळी मोनॅकोतील उत्पन्न कर रद्द केला. कॅसिनोतून मिळणाऱ्या उत्पन्नावर देशाचा खर्च भागवला जात होता. त्यामुळे देशात श्रीमंत लोकांचा ओघ वाढला आणि मोनॅकोने ‘टॅक्स हेवन’ म्हणून ओळख कमावली.

मोनॅकोमध्ये राहायचं असेल तर या गोष्टी गरजेच्या...

मोनॅकोमध्ये राहण्यासाठी काही अटी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते:

  • किमान वय: 16 वर्षे

  • गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी: पोलिस प्रमाणपत्र आवश्यक

  • घर असणं आवश्यक: मालकी किंवा भाड्याचं घर असावं किंवा कुटुंबातील सदस्याकडे राहणं मान्य

  • आर्थिक स्थैर्य: स्वतःचा खर्च चालवण्यासाठी पुरेशी आर्थिक साधनं असल्याचं पुराव्यानं दाखवावं लागतं

  • वास्तव्याचा कालावधी: वर्षातील 183 दिवसांपेक्षा जास्त काळ मोनॅकोमध्ये वास्तव्य आवश्यक

इतर करमुक्त देश

मोनॅकोसारखे काही इतर देश किंवा प्रदेश आहेत, जे करसवलतींमुळे श्रीमंत व्यक्ती आणि व्यावसायिकांना आकर्षित करत आहेत.

  • संयुक्त अरब अमिराती (UAE): वैयक्तिक उत्पन्न किंवा भांडवली नफ्यावर कर नाही

  • कतार: पगारावर किंवा भांडवली नफ्यावर कर नाही

  • बरमुडा, बहामाज, केमेन आयलंड्स: कुठलाही वैयक्तिक कर नाही

  • कुवेत, ओमान: वैयक्तिक उत्पन्नावर कर नाही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT