पुढारी ऑनलाईन डेस्क
गेले तीन वर्षे सुरु असलेले रशिया - युक्रेन युद्ध थांबण्याची शक्यता आहे. ३० दिवसाच्या युद्धविरामाच्या प्रस्तावाला रशियाने प्रतिसाद दिला आहे. यापूर्वीच युक्रेनने हा प्रस्ताव मान्य केला आहे. आज शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष ल्वादिमीर पुतीन यांच्याशी युद्धबंदीसंदर्भात यशस्वी चर्चा केली आहे. आज तकने याबाबत बातमी दिली आहे.
ट्रम्प यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की ‘सुरु असलेल्या चर्चांमधून हे भयंकर युद्ध समाप्त होण्याची शक्यता आहे. हजारो युक्रेनी सैनिक रशियाच्या सैन्याद्वारे घेरले गेले आहेत. ते खूपच कमजोर पडले आहेत. पुतीन यांना विनंती आहे की या सैनिकांना जीवदान द्यावे.’ रशियाचे सत्ताकेंद्र क्रेमलिनने यावर प्रतिक्रीया दिली असून ही युद्धबंदी होऊ शकतो असे म्हटले आहे.
युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांनी हा युद्धबंदी प्रस्ताव स्वीकारला आहे. क्रेमलीनने हा प्रस्ताव मान्य केला आहे, पण पुतीन यांनी या प्रस्तावामध्ये अजून काही अटी व शर्थी पूर्ण केल्या नसल्याचे म्हटले आहे. ‘त्यांनी म्हटले आहे की आम्ही या प्रस्तावाचे समर्थन करतो आहोत पण अजूनही काही मुद्यावंर चर्चा झाली पाहिजे, अमेरिका आणि इतर सहकाऱ्यांनी यावर चर्चा केली पाहिजे.
तर युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांनी म्हटले आहे की ‘मी युद्धविरामासाठी खूपच गंभीर आहे आणि माझ्यासाठी युद्धाचा शेवट होणे महत्वाचे आहे’ जेलेंस्की यांनी शुक्रवारी म्हटले की युद्धविरामाच्या बाबतीत अनेक अडचणीचे मुद्दे घालून रशियाकडून या प्रस्तावाच्या अंमलबजावणीस विलंब केला जात आहे. या आठवड्यात अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सौदीअरेबियामध्ये युक्रेनच्या अधिकाऱ्यांबरेाबर आठ तास चर्चा केली. त्यानंतर युक्रेनने या प्रस्तावास मान्यता दिली आहे. दरम्यान पाठिमागील काही आठवडे अमेरिकेचे अधिकारी व रशियाचे अधिकारी यांच्यामध्ये चर्चा झाली होती.