मॉस्को/कीव्ह; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्धाला नवे वळण देत युक्रेनने गुरुवारी रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला चढविला. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानुसार रात्रभरात युक्रेनकडून डागण्यात आलेले सुमारे १,००० ड्रोन आणि चार क्रूझ क्षेपणास्त्रे पाडण्यात आली. यापैकी जवळपास २०० ड्रोन रशियाची राजधानी मॉस्कोच्या दिशेने डागली होती.
या हल्ल्यात दक्षिण रशियातील रोस्तोव प्रांतातील एक महत्त्वाचा तेलसाठा (ऑइल डेपो) भीषण स्फोटानंतर उद्ध्वस्त झाला. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याशिवाय मॉस्कोमधील कपोतन्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर (रिफायनरी) देखील हल्ला करण्यात आला. स्फोट इतका तीव्र होता की, तेलसाठ्याच्या टाकीचे झाकण अनेक मीटर उंच हवेत उडाले आणि परिसरात काळ्या धुराचे प्रचंड लोट पसरले. हल्ल्यानंतर जवळील एका शॉपिंग सेंटरलाही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.
ड्रोनचे अवशेष कोसळल्याने काही निवासी आणि व्यावसायिक इमारतींचे नुकसान झाले. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक उंच इमारती रिकाम्या करण्यात आल्या, तर मॉस्कोतील काही विमानतळांवरील उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली. हल्ल्यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे कझान येथे दक्षिण-पूर्व आशियाई देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होते. मात्र, या हल्ल्याबाबत त्यांनी अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत तो कीव्हवरील रशियन हल्ल्यांना दिलेले प्रत्युत्तर असल्याचे म्हटले. "युक्रेन जळत असेल तर मॉस्कोही जळेल," असे विधान करत त्यांनी रशियाच्या युद्धयंत्रणेला पाठबळ देणाऱ्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच युद्ध संपवण्यासाठी रशियाने आता राजनैतिक मार्ग स्वीकारावा, असे आवाहनही त्यांनी केले.