पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर (UK PM Keir Starmer) यांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने हिंदू समुदायासाठी १० डाउनिंग स्ट्रीट (10 Downing Street) येथे दिवाळी रिसेप्शन (Diwali reception) ठेवले होते. या पार्टीत हिंदू समुदायातील प्रमुख व्यक्ती तसेच राजकीय नेते सहभागी झाले होते. पण या दिवाळी पार्टीच्या मेन्यूतील काही पदार्थांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीच्या मेन्यूत मांसाहारी पदार्थ आणि दारूचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर ब्रिटनमधील काही हिंदूंनी दिवाळी पार्टीत मांसाहारी पदार्थ आणि दारुचा समावेश केल्याबद्दल टीका केली होती. यानंतर पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या कार्यालयाने दिवाळी रिसेप्शन पार्टीतील चुकीच्या गोष्टीबद्दल माफी मागितली आहे.
स्टार्मर यांच्या कार्यालयातील प्रवक्त्याने, हिंदू समुदायाच्या भावना समजून घेत भविष्यातील पार्टीत असे पुन्हा घडणार नाही, असे आश्वासन दिल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. प्रवक्त्याने म्हटले आहे की, "आम्ही हिंदूंच्या भावनांची ताकद समजतो आणि हिंदू समुदायाला असे आश्वासन दिले आहे की, असा प्रकार पुन्हा होणार नाही."
मूळ भारतीय वंशाच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदार शिवानी राजा यांनी औपचारिकपणे पंतप्रधान स्टार्मर यांना लिहिलेल्या पत्रात दिवाळी पार्टीतील काही पदार्थांबाबत आक्षेप नोंदवला होता. हा कार्यक्रम अनेक हिंदूंच्या रीतिरिवाजांशी सुसंगत नव्हता. त्यांनी हिंदू परंपरांबद्दल ज्ञानाचा अभाव असल्याचे निदर्शनास आणून देत दिवाळी पार्टीच्या आयोजकांवर टीका केली होती. त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या नाराजीची दखल घेत ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाने घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.
ब्रिटनमध्ये चौदा वर्षानंतर सत्तापरिवर्तन झाले. ब्रिटनमधील निवडणुकीत मूळ भारतीय वंशाचे असलेले ऋषी सुनाक (Rishi Sunak) यांच्या नेतृत्त्वाखालील कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा कीर स्टार्मर (Keir Starmer) यांच्या नेतृत्त्वाखालील लेबर पक्षाने दारुण पराभव केला. ब्रिटन संसदेच्या ६५० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत लेबर पक्षाने ४१२ जागा जिंकल्या. तर कन्झर्व्हेटिव्ह पार्टीला केवळ १२१ जागांवर समाधान मानावे लागले. यामुळे कीर स्टार्मर (वय ६१) हे ब्रिटनचे ५८ वे पंतप्रधान बनले. दरम्यान, या वर्षी २९ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेला दिवाळी रिसेप्शन हा लेबर पक्षाच्या नेतृत्त्वाखालील सरकारचा निवडणुकीतील विजयानंतरचा पहिला कार्यक्रम होता.