लंडन : पुढारी ऑनलाईन
मानवी मज्जासंस्थेवर परिणाम करणाऱ्या `नोवीचोक` या नर्व्ह एजंट पदार्थाचा ब्रिटनमधील आणखी दोघा नागरिकांवर विषप्रयोग झाल्याचे आढळून आले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत ब्रिटन सरकारने आज तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलविली आहे.
याआधी ब्रिटनमधील साल्सबरी शहरात रशियाचे माजी गुप्तहेर सर्गेही स्क्रिपल आणि त्यांच्या मुलीवर ज्या विषाचा प्रयोग झाला होता; त्याच विषाचा प्रयोग आणखी दोघांवर झाल्याचे आढळून आले आहे. ही घटना ब्रिटनमधील नैऋत्य भागात असलेल्या अमेसबरी गावात घडली आहे. या विषाचा वापर कथित रासायनिक हत्यार म्हणून वापर केला जात असल्याचे समजते.
"दोन व्यक्तींवर `नोवीचोक` या विषाचा प्रयोग झाला असल्याचे संरक्षण खात्याच्या प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीनंतर स्पष्ट झाले आहे. या विषारी पदार्थाची निर्मिती सोव्हियत रशियाकडून करण्यात येते", अशी माहिती ब्रिटनचे दहशतवादविरोधी पोलिस पथकाचे प्रमुख नाईल बासू यांनी दिली आहे. हे दोघे जण या अतिविषारी पदार्थाच्या संपर्कात कसे आले, याचा तपास करण्यासाठी चौकशी पथक नेमण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.