UK MP Rupert Lowe grooming gangs Speech
लंडन: ब्रिटनमधील ग्रूमिंग गँग्स प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ब्रिटिश खारादार रुपर्ट लोवे यांनी संसदेत भावनिक भाषण करत लैंगिक शोषणाच्या बळी ठरलेल्या महिलांच्या आणि मुलींच्या धक्कादायक साक्षी वाचून दाखवल्या. या साक्षींमध्ये अल्पवयीन मुलींवर झालेल्या सामूहिक बलात्कार, हिंसा, धमक्या, वांशिक भेदभाव तसेच प्रशासन आणि पोलिसांच्या कथित निष्काळजीपणाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
गेल्या वर्षी खासदार लोवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या एका खासगी तपासणीत ब्रिटनमधील सुमारे ८५ भागांमध्ये टोळ्यांकडून बाल लैंगिक शोषण होत असल्याचे समोर आले होते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लोवे यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले होते की, मुख्यत्वे पाकिस्तानी वंशाच्या पुरुषांचा समावेश असलेल्या या टोळ्या अनेक दशकांपासून सक्रिय आहेत. समूहाकडून होणाऱ्या बाल लैंगिक शोषणाबाबतच्या एका स्वतंत्र चौकशीदरम्यान पीडितांचे जबाब नोंदवण्यात आले होते. लोवे यांनी संसदेत सांगितले की, पीडितांच्या साक्षी संपूर्ण जगाने ऐकल्या पाहिजेत. त्यांनी संसद सदस्यांना पीडितांच्या वेदना समजून घेण्याचे आणि आता तरी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले.
संसदेत वाचण्यात आलेल्या साक्षींमध्ये अल्पवयीन मुलींवर झालेल्या अमानुष अत्याचारांचे वर्णन होते. एका पीडितेने सांगितले की, "त्या नराधमाने कपडे उतरवले आणि माझ्यावर बलात्कार केला. वीर्यस्खलनापूर्वी तो थांबला. त्याने जॅक डॅनियल्सची (दारूची) रिकामी बाटली घेतली आणि ती माझ्या गुप्तांगात जबरदस्तीने घुसवली. तिथेच त्याने ती काच फोडली. त्या वेळी मी साधारण १२ किंवा १३ वर्षांची होते."
लोवे यांनी वाचलेल्या दुसऱ्या एका जबाबात म्हटले होते: "पुरुषांनी माझे हात-पाय दाबून धरले आणि प्रत्येकाने आळीपाळीने माझ्यावर बलात्कार केला. अत्याचार संपल्यानंतर त्यांनी मला बेदम मारहाण केली आणि जर मी कोणाला काही सांगितले, तर मला शोधून मारून टाकण्याची आणि माझ्या कुटुंबीयांना इजा करण्याची धमकी दिली."
काही गुन्हेगारांनी पीडितांचा छळ करण्यासाठी, त्यांना एकटे पाडण्यासाठी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वंश आणि धर्माचा वापर केल्याच्या जबाबांचाही लोवे यांनी उल्लेख केला. चौकशी दरम्यान एका पीडितेने सांगितले की, "सतत अशी टिका केली जायची की गोऱ्या मुलींना, ख्रिश्चन मुलींना कमी नैतिकतेच्या किंवा कमी मूल्यांच्या मानले जाते, तर मुस्लिम मुलींना काही पुरुषांकडून प्रतिष्ठित आणि उच्च नैतिकतेच्या म्हणून वर्णन केले जायचे. माझ्यासोबत झालेल्या वर्तनाचे समर्थन करण्यासाठी आणि मला अधिक अपमानित व नियंत्रित करण्यासाठी या तुलनांचा वापर केला गेला."
दुसऱ्या एका जबाबात अत्याचार दरम्यान पीडितेच्या ख्रिश्चन धर्माची कशी चेष्टा केली गेली याचे वर्णन सांगितले. "माझा मुख्य संघर्ष धार्मिक बाजूशी होता कारण मी ख्रिश्चन म्हणून वाढले होते. मी माझे गळ्यातील लॉकेट घालायचे कारण ते माझ्यासाठी खूप खास होते. मला मानसिकदृष्ट्या तोडण्यासाठी याचा वापर केला गेला. ते म्हणायचे, 'आता तुझा देव कुठे आहे? तुझ्या देवाने तुला सोडून दिले का?'"
खासदार लोवे यांनी पुढे सांगितले की, गेल्या काही दशकांपासून ब्रिटनमध्ये हे रॅकेट सुरू आहे. एका पीडितेने दिलेल्या साक्षीत म्हटले आहे, "मी अवघ्या १३ वर्षांची असताना या नरकयातना भोगणे सुरू झाले. पुढील तीन वर्षांत जवळपास ६०० ते ७०० नराधमांनी माझ्यावर अत्याचार केले." अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, काही पीडितांनी या गुन्ह्यात स्थानिक पोलिसांचाही सहभाग असल्याचा आरोप केला आहे. देशातील विविध भागांत पोलिसांकडूनच आपल्यावर बलात्कार झाल्याचे एका पीडितेने सांगितले.
चौकशी दरम्यान समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. एका महिलेने दिलेल्या साक्षीत सांगितले की, "माझ्याभोवती जे पुरुष होते ते व्हिडिओ बनवत होते आणि हसत होते. कुत्रा माझ्यावर खरोखर बलात्कार करू शकतो की नाही यावर ते पैजा लावत होते. एका कुत्र्याकडून माझ्यावर बलात्कार केला गेला, अशी अत्यंत वेदनादायी आपबिती एका पीडितेने मांडली. ईद आणि इतर सुट्ट्यांच्या काळात या अत्याचार करणाऱ्या टोळ्यांच्या पार्ट्यांचे आयोजन वाढायचे आणि त्यात मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुलींना ओढले जायचे, असेही उघड झाले आहे.
लोवे यांनी आणखी एका पीडितेचा उल्लेख केला जिने सांगितले की, "माझ्या गुप्तांगातून रक्तस्त्राव होत होता आणि इतकी सूज आली होती की मी बसू शकत नव्हते. मी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना सांगितले की माझ्या पेयात काहीतरी मिसळले गेले होते आणि मला माहित नाही काय झाले, कारण मी खरे सांगायला खूप घाबरले होते. त्यांनी कोणतेही प्रश्न विचारले नाहीत. त्यांनी मला गोळ्या दिल्या आणि डिस्चार्ज दिला. तेव्हा मी १५ वर्षांची होते."
"संसदेत बसलेल्या आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे की आता केवळ चर्चा न करता ठोस कारवाई करावी. येत्या काही दिवसांत या बलात्कार टोळ्यांविषयीचा आमचा स्वतंत्र चौकशी अहवाल प्रसिद्ध होईल, जो ब्रिटनची व्यवस्था कायमची बदलून टाकेल," असा इशारा खासदार रुर्ट लोवे यांनी संसदेत दिला.
ब्रिटनमध्ये प्रामुख्याने ११ ते १६ वर्षे वयोगटातील गरीब किंवा कौटुंबिक समस्या असलेल्या अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, अमली पदार्थ किंवा दारूचे व्यसन लावणे आणि त्यानंतर धमकावून किंवा जबरदस्तीने त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करणे, याला 'ग्रूमिंग गँग्स' म्हटले जाते. २००२ मध्ये सर्वप्रथम या प्रकरणावर राजकीय वर्तुळात चर्चा झाली होती. त्यानंतर २०१० मध्ये रॉदरहॅम, रॉशडेल, ओल्डहॅम यांसारख्या शहरांमध्ये अशी मोठी रॅकेट्स उघडकीस आली, ज्यामध्ये प्रामुख्याने ब्रिटिश-पाकिस्तानी पुरुषांचा समावेश होता. या प्रकरणी अनेकांना तुरुंगवास झाला असला, तरीही हे रॅकेट मूळ धरून असल्याचा दावा आता नव्या पुराव्यांवरून केला जात आहे.