Uganda Muhoozi Kainerugaba
कंपाला: आफ्रिकन देश युगांडाचे लष्करप्रमुख जनरल मुहूजी कैनेरुगाबा यांनी तुर्की सरकारकडे केलेल्या एका अजब मागणीमुळे सध्या जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. "तुर्कीने युगांडाला १ अब्ज डॉलर्स (सुमारे ९ हजार कोटी रुपये) द्यावेत आणि तुर्कीमधील सर्वात सुंदर मुलीशी माझे लग्न लावून द्यावे," अशी मागणी कैनेरुगाबा यांनी केली आहे. विशेष म्हणजे, ३० दिवसांत या मागण्या मान्य न झाल्यास तुर्कीचे दूतावास बंद करण्याची धमकीही त्यांनी दिली आहे.
११ एप्रिल रोजी जनरल कैनेरुगाबा यांनी 'एक्स' वर एकामागून एक अनेक पोस्ट केल्या. यामध्ये त्यांनी सोमालियातील सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. गेल्या दोन दशकांपासून युगांडाचे सैन्य सोमालियात 'अल-शबाब' या दहशतवादी संघटनेविरुद्ध लढा देत आहे. या लढाईत युगांडाने मोठी जीवितहानी सोसली असून अतोनात पैसा खर्च केला आहे.
कैनेरुगाबा यांचा आरोप आहे की, युगांडाने सोमालियात सुरक्षा पुरवली, मात्र त्याचा आर्थिक फायदा तुर्कीने उठवला. तुर्कीने सोमालियामध्ये रस्ते, बंदरे आणि विमानतळांची बांधणी करून प्रचंड नफा कमावला आहे. त्यामुळे तुर्कीने आता युगांडाला 'सुरक्षा शुल्क' म्हणून १ अब्ज डॉलर्स द्यावेत, असे त्यांचे म्हणणे आहे.
आर्थिक मागणीसोबतच लष्करप्रमुखांनी तुर्कीच्या सर्वात सुंदर मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही त्यांची 'वैयक्तिक मागणी' असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले. जरी ही मागणी उपरोधिक किंवा विनोदी वाटत असली, तरी एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने असे विधान केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
केवळ मागणी करूनच कैनेरुगाबा थांबले नाहीत, तर त्यांनी तुर्कीला निर्वाणीचा इशारा दिला आहे. ३० दिवसांची मुदत दिली असून मागण्या पूर्ण न झाल्यास युगांडातील तुर्कीचा दूतावास बंद केला जाईल. तुर्कीच्या विमान कंपन्यांना युगांडाच्या हवाई हद्दीतून उड्डाण करण्यास मनाई केली जाईल. त्यांनी युगांडाच्या नागरिकांना तुर्कीला न जाण्याचा सल्लाही दिला आहे.
मुहूजी कैनेरुगाबा हे केवळ युगांडाचे लष्करप्रमुखच नाहीत, तर ते राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांचे सुपुत्र आहेत. त्यांना मुसेवेनी यांचे राजकीय वारसदार आणि युगांडाचे भावी राष्ट्राध्यक्ष मानले जाते. सोशल मीडियावर सक्रिय राहणारे कैनेरुगाबा आपल्या वादग्रस्त आणि अजब विधानांसाठी ओळखले जातात. यापूर्वीही त्यांनी अशाच प्रकारच्या विधानांनी अनेकदा राजनैतिक पेच निर्माण केला आहे.