UAE Pakistan loan repayment | यूएईने पैसे मागताच पाकिस्तानने गुडघे टेकले  
आंतरराष्ट्रीय

UAE Pakistan loan repayment | यूएईने पैसे मागताच पाकिस्तानने गुडघे टेकले

सौदीसोबत पाकने केलेल्या संरक्षण करारामुळे यूएई नाराज : लष्करप्रमुख मुनीर यांचा अचानक संयुक्त अरब अमिरातीचा दौरा

पुढारी वृत्तसेवा

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर अचानक संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दौर्‍यावर पोहोचले आहेत. सौदी अरेबियासोबत पाकिस्तानने केलेल्या संरक्षण करारामुळे यूएई नाराज असल्याची चर्चा होत असतानाच हा दौरा होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सौदी आणि यूएईमधील प्रादेशिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर यूएईने पाकिस्तानकडे थकीत कर्जाची परतफेड करण्याची मागणी केली आहे. या बिघडलेल्या संबंधांना सुधारण्यासाठी मुनीर यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

अबू धाबी येथे जनरल मुनीर यांनी यूएईचे उपशासक आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शेख तहनून बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संयुक्त अरब अमिरातीची सुरक्षा आणि स्थिरता ही पाकिस्तानच्या सुरक्षेचा अविभाज्य भाग असल्याचे प्रतिपादन केले.

पाकिस्तान-यूएई संबंधांतील तणाव

गेल्या काही वर्षांपासून उभय देशांमधील संबंधांमध्ये काहीसा दुरावा निर्माण झाला आहे. हा तणाव निवळण्यासाठी आठवड्याभरापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी यूएईचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद झायेद बिन अल नाहयान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. मात्र, त्यातून ठोस तोडगा न निघाल्याने आता लष्करप्रमुख असीम मुनीर स्वतः अबू धाबीमध्ये पोहोचले आहेत. विशेष म्हणजे गेल्या महिन्यातच मुनीर यांनी सौदी अरेबियाचाही दौरा केला होता. सौदीशी वाढती जवळीक आणि संरक्षण करारामुळे यूएई नाराज असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त

या भेटीदरम्यान जनरल मुनीर यांनी यूएई सरकारने गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तानच्या अर्थव्यवस्था आणि सुरक्षेला दिलेल्या खंबीर पाठिंब्याबद्दल आभार मानले. यूएईचा पाठिंबा दोन्ही देशांमधील ऐतिहासिक आणि बंधुभावाच्या संबंधांचे प्रतीक आहे. पाकिस्तानच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात यूएईच्या नेतृत्वाची भूमिका अत्यंत विधायक राहिली आहे, असे मुनीर यांनी यावेळी नमूद केले.

पाकिस्तानी लष्कराची अधिकृत भूमिका

पाकिस्तानी लष्कराची प्रसिद्धी शाखा इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यावर चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने आर्थिक सहयोग, गुंतवणूक आणि सुरक्षा क्षेत्रातील समन्वयावर भर देण्यात आला. याशिवाय प्रादेशिक घडामोडींवर विचारांचे आदान-प्रदान करण्यात आले असून शांतता व स्थिरतेसाठी दोन्ही देशांनी निरंतर संपर्कात राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT