UAE Truck Accident | यूएईत ट्रकची २३ वाहनांना धडक; तीन भारतीयांसह १४ जणांचा मृत्यू File Photo
आंतरराष्ट्रीय

UAE Truck Accident | यूएईत ट्रकची २३ वाहनांना धडक; तीन भारतीयांसह १४ जणांचा मृत्यू

केरळममधील जुळ्या भावंडांचा मृतांत समावेश; ३० जखमी

पुढारी वृत्तसेवा

फुजैराह; वृत्तसंस्था : संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) फुजैराह येथे गुरुवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने तब्बल २३ वाहनांना धडक दिली. या अपघातात तीन भारतीयांसह १४ जणांचा मृत्यू झाला, तर ३० जण जखमी झाले आहेत. मृत भारतीय केरळममधील मलप्पुरम जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील होते. त्यात जुळ्या भाऊ-बहिणीचाही समावेश आहे.

धडकेनंतर अनेक वाहनांनी पेट घेतला. आगीत काही मृतदेह पूर्णपणे जळाल्याने मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी केली जात आहे. वाहनांना लागलेल्या आगीचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. फुजैराह शहराच्या प्रवेशमार्गावर मध्यरात्री हा अपघात झाला. या धडकेनंतर लागलेली आग वेगाने इतर वाहनांमध्ये पसरली. अपघातात एकूण २३ वाहनांचे नुकसान झाले. त्यात १८ कार आणि पाच ट्रकचा समावेश होता.

मृतांमध्ये यूएई, ओमान, भारत, ब्राझील, पाकिस्तान, जॉर्डन आणि इजिप्त या सात देशांतील नागरिकांचा समावेश आहे. जखमी झालेल्या ३० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी निम्म्या जणांना उपचारानंतर घरी सोडले आहे.

केरळमच्या मुख्यमंत्र्यांचे मदतीचे निर्देश

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांची नावे मुहम्मद अस्मिल, त्यांची जुळी बहीण मिस्ना जुबिन आणि मुहम्मद फैज अशी आहेत. केरळमचे मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांनी पीडित कुटुंबाला आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासानेही तीन भारतीयांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT