इस्लामाबाद; वृत्तसंस्था : सौदी अरेबिया आणि तुर्कियेसोबत झालेल्या संरक्षण कराराच्या आडोशाने पाकिस्तान वेगाने शस्त्रास्त्रांचा साठा वाढवत आहे. विशेष म्हणजे १९ ते २१ ऑगस्टदरम्यान सुमारे ६० तासांच्या कालावधीत तुर्कियेच्या डझनभर लष्करी विमानांनी पाकिस्तानमधील वेगवेगळ्या एअरबेसवर लँडिंग आणि टेकऑफ केले. यामध्ये सी १३० लष्करी वाहतूक विमाने आणि ए ४०० एम जंबो लष्करी विमानांचा समावेश होता.
रावळपिंडीच्या नूरखान आणि कराचीच्या मसरूर एअरबेसवर तुर्कियेच्या सी १३० लष्करी विमानांची सतत वर्दळ पाहायला मिळाली. तसेच 'टीयूएएफ ५२६' या कॉल साईनद्वारे ओळखले गेलेले ए ४०० एम विमान मुरीद एअरबेसवर पोहोचले. या विमानांच्या माध्यमातून तुर्कियेने पाकिस्तानला ड्रोनचा मोठा साठा पोहोचवला आहे. उपग्रहाद्वारे मागोवा घेणे टाळण्यासाठी आणि हालचाली लपवण्यासाठी हा ड्रोनचा पुरवठा रात्रीच्या अंधारात करण्यात आला. तुर्कियेकडून आलेला हा ड्रोनचा साठा बहावलपूर आणि रावळपिंडी येथील लष्करी साठवणूक केंद्रांमध्ये ठेवण्यात आला आहे.
मक्का येथे झालेल्या संरक्षण करारादरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी तुर्कियेचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तय्यप एर्दोगन यांना ड्रोन देण्याची विनंती केली होती. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेचे मोठे नुकसान झाले होते, अशी माहिती मुनीर यांनी दिली होती. चीनकडून पाकिस्तानला जे सीरिजची लढाऊ विमाने पुरेशा प्रमाणात मिळाली असली, तरी या संघर्षात त्यांच्याकडचे ड्रोनचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर संपुष्टात आले होते.
पाकिस्तानला तुर्कियेकडून आधुनिक ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि इतर संरक्षण उपकरणे मिळाली आहेत. यामध्ये एआय संचालित केमांके क्रूझ मिसाईल, बायराक्तर टीबी २ आणि अकिंसी ड्रोनचा समावेश आहे. याशिवाय तुर्कियेने पाकिस्तानच्या एफ १६ लढाऊ विमानांचे आधुनिकीकरण करण्यातही मदत केली आहे.