Yildirimhan missile Turkey File Photo
आंतरराष्ट्रीय

Turkey vs India: तुर्कीने गुप्तपणे बनवले खतरनाक 'वीज' क्षेपणास्त्र; निशाण्यावर थेट भारत, काश्मीर मुद्द्याशी काय आहे संबंध?

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताविरोधी भूमिका घेणाऱ्या तुर्कीने आता भारताची चिंता वाढवणारे एक नवे पाऊल उचलले आहे.

मोहन कारंडे

Turkey vs India

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताविरोधी भूमिका घेणाऱ्या तुर्कीने आता भारताची चिंता वाढवणारे एक नवे पाऊल उचलले आहे. तुर्कीने अत्यंत गुप्तपणे एका अत्यंत धोकादायक अशा आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र 'यिल्दिरिम्हान' (वीज) ची निर्मिती केली असून, या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात संपूर्ण भारत येत असल्याचे समोर आले आहे.

इस्तंबूल येथे आयोजित 'सहा २०२६' संरक्षण आणि अंतराळ प्रदर्शनात तुर्कीने 'यिल्दिरिमहान' (ज्याचा अर्थ वीज असा होतो) हे आपले नवे आंतरखंडीय क्षेपणास्त्र सादर केले. तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांची वाढती इस्लामी महत्त्वाकांक्षा आता केवळ पश्चिम आशियापुरती मर्यादित राहिलेली नाही, हेच या क्षेपणास्त्राच्या निर्मितीवरून स्पष्ट होत आहे. एर्दोगन यांनी यापूर्वीही अनेकदा पाकिस्तानची बाजू उचलून धरत काश्मीरमधील दहशतवादाचे समर्थन केले आहे.

२५ मॅकचा वेग, ३ हजार किलो वजन वाहून नेण्याची क्षमता

'संडे गार्डियन'च्या वृत्तानुसार, ५ मे २०२६ रोजी इस्तंबूलमधील संरक्षण प्रदर्शनात या 'यिल्दिरिमहान' (वीज) क्षेपणास्त्राचे अनावरण करण्यात आले. तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे क्षेपणास्त्र तब्बल ३ टन वजनाचे अण्वस्त्र किंवा दारूगोळा वाहून नेण्यास सक्षम असून, त्याचा वेग २५ मॅक (ध्वनीच्या वेगापेक्षा २५ पट अधिक) इतका प्रचंड आहे. तुर्कीचे दावे खरे मानले, तर या वर्षाच्या अखेरीस या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी घेतली जाऊ शकते. या क्षेपणास्त्राच्या मारक क्षमतेमुळे संपूर्ण युरोप, आफ्रिका, पश्चिम आशिया आणि भारताचा संपूर्ण भूभाग तुर्कीच्या निशाण्यावर आला आहे.

आधीच 'तैफून' असताना नव्या क्षेपणास्त्राची गरज का?

तुर्कीकडे आधीच 'तैफून' नावाचे क्षेपणास्त्र असताना एवढ्या मोठ्या मारक क्षमतेच्या नव्या क्षेपणास्त्राची गरज का भासली? असा प्रश्न आता संरक्षण तज्ज्ञ उपस्थित करत आहेत. तुर्कीचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले ग्रीस, सायप्रस, इस्रायल, इजिप्त, आर्मेनिया आणि इराण हे सर्व देश आधीच तुर्कीच्या 'तैफून' क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येतात. त्यामुळे सीमेवरील देशांना लक्ष्य करण्यासाठी कोणत्याही देशाला 'आयसीबीएम'ची गरज नसते.

या नव्या क्षेपणास्त्राच्या कक्षेचा विचार केला, तर तुर्की इंडोनेशिया किंवा आइसलँडवर हल्ला करण्याची शक्यता अजिबात नाही. तसेच, तुर्की स्वतः 'नाटो'चा सदस्य असल्याने रशियाचा मुकाबला करण्यासाठी त्याला स्वतंत्रपणे लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची गरज भासणार नाही. या सर्व समीकरणांमुळे तुर्कीच्या या महाकाय क्षेपणास्त्राचे एकमेव संभाव्य लक्ष्य 'भारत'च असू शकते, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.

पाकिस्तानची ढाल बनण्याचा तुर्कीचा डाव

संरक्षण क्षेत्रातील अभ्यासक लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) जे. एस. सोढी यांच्या मते, तुर्की भारतावर थेट हल्ला करणार नाही. मात्र, काश्मीरमधील दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचे रक्षण करण्यासाठी आणि भारताने पाकिस्तानविरुद्ध कोणतीही लष्करी कारवाई केल्यास भारतावर दबाव आणण्यासाठी तुर्की या क्षेपणास्त्राचा वापर करू शकतो.

अध्यक्ष एर्दोगन यांचा कट्टर इस्लामी कल, भारताविषयीची द्वेष आणि स्वतःला मुस्लिम जगाचा 'खलिफा' म्हणून प्रस्थापित करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा पाहता, भारताच्या सीमेवर आता नवे संकट आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर नेहमीच काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तानची पाठराखण करणाऱ्या तुर्कीच्या या नव्या लष्करी हालचालींमुळे भारताची चिंता निश्चितच वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT