पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेत सत्तांतर झालं आणि डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष झाले. तेव्हापासून संपूर्ण जगाचे लक्ष अमेरिकेवर आहे. कारणही तसेच आहे, ट्रम्प दररोज एक नवी घोषणा करत एकामागून एक धक्कादायक निर्णय घेत आहेत. आता ते लवकरच अमेरिकेत गोल्ड कार्ड योजनेची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहेत. ही योजना अमेरिकेचे नागरिकत्व देणार्या ग्रीन कार्ड योजनेच्या धर्तीवरच असेल. मात्र ही केवळ श्रीमंत देशातील स्थलांतरित नागरिकांसाठीच असणार आहे. जाणून घेवूया ट्रम्प यांच्या नव्या घाेषणेविषयी...
ओव्हल कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले की, "आम्ही लवकरच गोल्ड कार्ड विकणार आहोत. हे गोल्ड कार्ड ग्रीन कार्ड प्रमाणेच असेल. त्याची किंमत पाच दशलक्ष डॉलर्स असेल. या कार्डद्वारे तुम्हाला ग्रीन कार्डसारखेच फायदे मिळतील. तसेच काही अतिरिक्त फायदे देखील असतील."
गोल्ड कार्ड योजना ही पुढील दोन आठवड्यात सुरू होणार आहे. त्यासाठी संसदेच्या मंजुरीचीही आवश्यकता नाही, असेही ट्रम्प यांनी या वेळी स्पष्ट केले. रशियाचे श्रीमंत अब्जाधीश देखील गोल्ड कार्डद्वारे अमेरिकन नागरिकत्व मिळवू शकतात का? या सवालवर ट्रम्प म्हणाले, "कदाचित. मला काही रशियन अब्जाधीश माहीत आहेत जे खूप चांगले आहेत. मला वाटतं त्याला गोल्ड कार्ड मिळू शकेल. यामुळे ते श्रीमंत आणि यशस्वी होतील; पण त्यांना खूप पैसे खर्च करावे लागतील आणि खूप करही भरावे लागतील. ही योजना खूप यशस्वी होईल," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डाेनाल्ड ट्रम्प यांची नवीन याेजना असणारे गोल्ड कार्ड पाच दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ५० लाख डॉलर्समध्ये मिळू शकते. भारतीय चलनात याचे मूल्य सुमारे ४३ कोटी रुपये इतके हाेते. त्यामुळे ही याेजना श्रीमंत' स्थलांतरित नागरिकांसाठी असून, अमेरिकेची तिजाेरी आणखी भरणारी असेल.
या नव्या याेजनेबाबत माहिती देताना ट्रम्प प्रशासनातील वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी म्हटलं आहे की, "गोल्ड कार्ड हे प्रत्यक्षात एक प्रकारचे ग्रीन कार्ड असेल. ट्रम्प यांची ही नवीन 'गोल्ड कार्ड' योजना सध्याच्या EB-5 योजनेची जागा घेणार आहे. याद्वारे, परदेशी गुंतवणूकदार अमेरिकन व्यवसायांमध्ये गुंतवणूक करून ग्रीन कार्ड मिळवू शकतील. 'गोल्ड कार्ड'मधून मिळणारे पैसे थेट सरकारकडे जमा होतील."