Donald Trump :
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज एक मोठा दावा केला आहे. भारताने रशियाकडून तेल आयात करणे थांबवले असल्याचे आपण 'ऐकले' असून, हे एक 'चांगले पाऊल' असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तथापि, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर आपली भूमिका स्पष्ट केली असून, देशाची ऊर्जा खरेदी ही बाजारपेठेतील घडामोडी आणि राष्ट्रीय हितावर अवलंबून असल्याचे म्हटले आहे. भारतीय तेल कंपन्यांनी रशियन तेल आयात थांबवल्याच्या वृत्ताबाबत कोणतीही माहिती नसल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ट्रम्प म्हणाले, "माझ्या माहितीनुसार, भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही. मी असे ऐकले आहे, मला माहित नाही की ते खरे आहे की नाही. पण हे एक चांगले पाऊल आहे. पुढे काय होते ते पाहूया."
ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा त्यांनी यापूर्वी भारतावर २५% शुल्क लादले होते आणि रशियासोबत शस्त्रे व कच्च्या तेलाचा व्यापार सुरू ठेवल्यास अतिरिक्त दंडात्मक कारवाईचा इशारा दिला होता. यापूर्वी त्यांनी पाकिस्तानसोबत तेल कराराची घोषणा करताना भारतावर निशाणा साधला होता. "कदाचित ते (पाकिस्तान) एक दिवस भारताला तेल विकतील!" असे उपरोधिक विधान त्यांनी केले होते.
दरम्यान, भारताने ट्रम्प यांच्या टीकेला आणि दाव्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारत आणि रशियामधील आर्थिक आणि सामरिक संबंधांवर ट्रम्प यांनी वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, ज्याला भारताने पूर्णपणे नाकारले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले, "आमचे विविध देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध स्वतःच्या गुणवत्तेवर टिकून आहेत आणि ते कोणत्याही तिसऱ्या देशाच्या चष्म्यातून पाहिले जाऊ नयेत. भारत आणि रशियाची भागीदारी स्थिर आणि काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेली आहे." या स्पष्टीकरणातून भारताने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्र असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.