आंतरराष्ट्रीय

Donald Trump | ‘आडवे आलात तर बॉम्ब टाकू’; ‘होर्मुझ’च्या प्रश्नावर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा ओमानला इशारा

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन; वृत्तसंस्‍था : होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रणाबाबत इराण आणि ओमान यांच्यात सुरू असलेल्या चर्चेवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘ओमानने या प्रकरणात अडथळा आणला, तर आम्ही त्यांच्यावर जोरदार बॉम्बहल्ला करू,’ असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

‘फॉक्स न्यूज’च्या प्रतिनिधी ट्रे यिंगस्ट यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना ट्रम्प यांनी इराणने शरणागती पत्करावी, अशी भूमिका मांडली. मात्र, त्यासाठी कोणतीही निश्चित मुदत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘मला घाई नाही,’ असेही ट्रम्प म्हणाले. होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित व्यापारी वाहतूक सुरू ठेवण्यासाठी इराण आणि ओमान यांच्यात चर्चा सुरू आहे. दोन्ही देशांनी या महत्त्वाच्या सागरी मार्गासाठी संयुक्त नौका वहन मार्गाचा नकाशाही तयार केला आहे.

दरम्यान, इराणचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी चर्चा सुरू असल्याचे सांगितले. या वाटाघाटींमध्ये सामुद्रधुनीतील दोन्ही किनारी देशांचे सार्वभौमत्व आणि व्यापारी जहाजांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यावर भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चर्चा लांबण्यामागे विषयाची गुंतागुंत, या प्रक्रियेत सहभागी अनेक घटकांचा प्रभाव आणि काही पक्षांकडून सुरू असलेले ‘विध्वंसक प्रयत्न’ ही प्रमुख कारणे असल्याचे बघाई यांनी सांगितले.

शस्‍त्रसाठ्यावर परिणाम झाल्‍याची कबुली

दरम्यान, पश्चिम आशियातील अमेरिकेच्या लष्करी कारवायांमुळे अमेरिकी शस्त्रसाठ्यावर परिणाम झाला असल्याची कबुली ट्रम्प यांनी दिली. मात्र, आतापर्यंत वापरण्यात आलेली शस्त्रे अमेरिकेच्या एकूण क्षमतेच्या तुलनेत अत्यल्प असल्याचा दावा त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT