US-Iran Tensions
वॉशिंग्टन : "जा आणि तुमचं कच्चे तेल(पेट्रोल-डिझेल ) तुम्हीच मिळवा!", असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्यांमध्ये अमेरिकेला साथ न देणाऱ्या मित्र राष्ट्रांना दिला आहे. सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल'वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, ज्या देशांनी "इराणविरोधातील मोहिमेत सहभागी होण्यास नकार दिला, त्यांनी एकतर अमेरिकेकडून तेल विकत घ्यावे किंवा हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून स्वतः जाऊन ते मिळवावे.
आपल्या पोस्टच्या ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, आता या देशांना स्वतःसाठी "लढायला" शिकावे लागेल. ज्याप्रमाणे कठीण काळात हे मित्रराष्ट्र अमेरिकेच्या पाठीशी उभे राहिले नाहीत, त्याचप्रमाणे यापुढे अमेरिकाही त्यांना कोणतीही मदत करणार नाही.
"हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे ज्या देशांना जेट इंधन मिळत नाहीये—जसे की युनायटेड किंगडम (UK), ज्याने इराणविरुद्धच्या कारवाईत सामील होण्यास नकार दिला—त्यांच्यासाठी माझ्याकडे एक सल्ला आहे: पहिले म्हणजे, अमेरिकेकडून तेल विकत घ्या, आमच्याकडे भरपूर साठा आहे. दुसरे म्हणजे, थोडे उशिरा का होईना पण धाडस दाखवा, सामुद्रधुनीत जा आणि स्वतःचे तेल स्वतः मिळवा," असे ट्रम्प यांनी लिहिले.
ट्रम्प यांनी पुढे नमूद केले की, "तुम्हाला आता स्वतःची लढाई स्वतः लढायला शिकावे लागेल. अमेरिका आता मदतीसाठी तिथे नसेल, कारण तुम्हीही आमच्यासाठी तिथे नव्हता. इराणचा जवळपास नायनाट झाला आहे, कठीण काम पूर्ण झाले आहे. आता जा आणि तुमचं तेल तुम्हीच मिळवा." दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंर महिना उलटला तरी, इराणने अजूनही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपले नियंत्रण कायम ठेवले आहे, ज्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होत आहे.