पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 180 देशांवर टॅरिफ लागू केले. त्याचा परिणाम जगभरातील अब्जाधीशांवरदेखील झाला आहे. टॅरिफ जाहीर झाल्यानंतर, सर्वात जास्त प्रभावित होणारे अब्जाधीश अमेरिकेतील होते.
ताज्या माहितीनुसार टॅरिफमुळे जगभरातील 500 अब्जाधीशांनी एका दिवसातच सुमारे 208 अब्ज डॉलर गमावले आहेत. या 500 अब्जाधीशांनी गमावलेली ही एकत्रित रक्कम आहे. (Billionaires Lost $208 Billion After Trump Tariff)
विशेष म्हणजे, ट्रम्प टॅरिफचा सर्वाधिक फटका फेसबुक म्हणजेच मेटा कंपनीचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना बसला आहे. त्यांच्या संपत्तीमध्ये 17.9 अब्ज डॉलरने घट झाली आहे. म्हणजेच त्यांची एकूण 9 टक्के संपत्ती कमी झाली आहे.
ब्लूमबर्गच्या बिलियनेअर्स इंडेक्सच्या 13 वर्षांच्या इहितासातील ही चौथी मोठी घट ठरली असून कोरोना महामारीपासूनची सर्वात मोठी घट आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे मित्र आणि सरकारी सल्लागार तसेच स्पेसएक्स-टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी 11 अब्ज डॉलर गमावले आहेत. कारण टॅरिफमुळे टेस्लाच्या शेअर्समध्ये 5.5 टक्क्यांची घट झाली.
टॅरिफमुळे प्रभावित झालेल्या इतर अब्जाधीशांमध्ये ॲमेझॉनचे जेफ बेझोसही आहेत. त्यांच्या शेअर्समध्ये 9 टक्क्यांची घट झाली. अमेझॉन कंपनीने एप्रिल 2022 पासून पाहिलेली ही सर्वात मोठी घट आहे. त्यामुळे त्यांना 15.9 अब्ज डॉलर गमावले आहेत.
ज्यांच्या संपत्तीत घट झाली अशा अन्य अमेरिकन अब्जाधीशांमध्ये मायकेल डेल (9.53 अब्ज डॉलर), लॅरी एलिसन (8.1 अब्ज डॉलर), जेनसन हुआंग (7.36 अब्ज डॉलर), लॅरी पेज (4.79 अब्ज डॉलर), सर्गेई ब्रिन (4.46 अब्ज डॉलर) आणि थॉमस पीटरफी (4.06 अब्ज डॉलर) यांचा समावेश आहे.
फ्रान्सचे बर्नार्ड आर्नॉल्ट यांची संपत्तीही मोठ्या प्रमाणात घटली आहे. युरोपीय संघाने अमेरिकेला निर्यात होणाऱ्या सर्व उत्पादनांवर 20 टक्के फ्लॅट टॅरिफ लागू केला आहे. ज्याचा परिणाम मद्य आणि लक्झरी वस्तूंच्या निर्यातीवर होऊ शकतो.
आर्नॉल्ट यांच्या LVMH या कंपनीच्या शेअर्सने पॅरिसमध्ये घट नोंदवली. त्यामुळे युरोपमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या आर्नॉल्ट यांच्या निव्वळ संपत्तीमधून 6 अब्ज डॉलर घट झाली.