अंकारा : रशियन एस ४०० हवाई संरक्षण प्रणाली विकत घेतल्यानंतर लादण्यात आलेले अमेरिकेचे निर्बंध हटविण्यात येतील. तसेच, तुर्कियेला ‘एफ ३५’ ही लढाऊ विमाने दिली जाणार आहेत, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. ‘नाटो’ शिखर परिषदेसाठी ते येथे दाखल झाले असून इराणविरुद्धच्या युद्धात इटली, जर्मनीने मदत केली नसल्याबद्दल त्यांनी टीका केली.
ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ग्रीनलँडवर अमेरिकेचे नियंत्रण असावे, ही भूमिका मांडली. ‘नाटो’मधील अनेक मित्रदेशांना हा विषय पुन्हा उपस्थित होऊ नये, अशी अपेक्षा होती; त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे मित्रदेशांची पुन्हा नाराजी वाढण्याची शक्यता आहे. ‘ग्रीनलँडच्या मुद्द्यामुळेच ‘नाटो’बरोबरचे माझे संबंध बिघडले. डेन्मार्क ग्रीनलँडला फारशी मदत करत नाही किंवा त्यावर खर्चही करत नाही; पण ग्रीनलँड अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या परिसरात चीनची आणि रशियाची जहाजे वावरत आहेत,’ असे ट्रम्प म्हणाले.