बायडेन यांचे 78 कायदे रद्द  Pudhari File Photo
आंतरराष्ट्रीय

बायडेन यांचे 78 कायदे रद्द

शपथविधीनंतर ट्रम्प यांचा झटका : हजारांवर अधिकार्‍यांची हकालपट्टी करण्याचाही इशारा

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : जगातील सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथविधीनंतर धडाकेबाज निर्णय घेण्यास प्रारंभ केला. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या राजवटीतील 78 कायदे ट्रम्प यांनी रद्द केले.

‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ धोरणाचा पाठपुरावा करण्यासाठी ट्रम्प यांनी बायडेन यांच्या प्रशासनातील चार उच्चपदस्थ अधिकार्‍यांची तत्काळ हकालपट्टी केली. आणखी एक हजार अधिकार्‍यांना घरी पाठविणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. अमेरिकेची अधोगती आता थांबली असून देशासाठी सुवर्णकाळ सुरू झाल्याची भावना ट्रम्प यांनी व्यक्त केली.

बायडेन यांनी नियुक्ती केलेले अधिकारी आणि कर्मचारी हे आमच्या धोरणात बसत नाहीत. त्यामुळेच त्यांची गच्छंती करण्यात येत असल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली. आम्हाला अमेरिकेला पुन्हा यशोशिखरावर न्यायचे आहे. त्यामुळेच आम्ही बायडेन यांच्या राजवटीत नियुक्त करण्यात आलेल्या अधिकार्‍यांना घरी पाठविण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. शपथविधीचा सोहळा पार पडल्यानंतर एका दणक्यात त्यांनी 8 कार्यकारी आदेशाच्या सेटवर स्वाक्षरी केली. यामध्ये आधीच्या सरकारचे 78 निर्णय रद्द करण्यासह अन्य निर्णयांचाही समावेश आहे. यामध्ये पॅरिस जलवायू करार आणि जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 2021 च्या कॅपिटॉल हिंसाचारातील 1600 आरोपींवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णयही घेण्यात आला. ट्रम्प यांचा पराभव झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या समर्थकांनी कॅपिटॉल हॉलवर हल्ला केला होता.

जन्मजात नागरिकत्व देणारा कायदा रद्द

जन्मजात नागरिकत्व बहाल करणारा 150 वर्षांपूर्वीचा कायदा रद्द करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. आधीच्या कायद्यानुसार तात्पुरता व्हिसा अथवा बेकायदा स्थलांतर केलेल्यांच्या मुलांना अमेरिकन नागरिकत्व मिळत होते. नव्या कायद्याची अंमलबजावणी एक महिन्यानंतर करण्यात येणार आहे. या नुसार विदेशी नागरिकांना अमेरिकेत अपत्यप्राप्ती झाली तरी त्यांना अमेरिकन नागरिकत्व मिळणार नाही. मेक्सिको सीमेवर त्यांनी तत्काळ आपत्कालीन स्थिती लागू केली आहे. यामुळे मेक्सिकोतील बेकायदा घुसखोरांना प्रतिबंध बसणार आहे. दरम्यान, टिकटॉकवरील बंदी मागे घेऊन आणखी 75 दिवस मुदत देण्याच्या आदेशावरही त्यांनी स्वाक्षरी केली.

अब्जाधीशांची उपस्थिती लक्षवेधी

उपराष्ट्राध्यक्ष जेडी वॅन्स, पत्नी उषा वॅन्स, मुले विवेक, इवान, मिराबेल ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित होते. याशिवाय जगातील सर्वाधिक श्रीमंत अब्जाधीश एलॉन मस्क, मेटाचे जॉन झुकेरबर्ग, लॉरेन सांचेज, अमेझॉनचे जेफ बेझोस, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आदी अब्जाधीश सोहळ्यास उपस्थित होते.

7.50 लाख भारतीयांचे धाबे दणाणले

अमेरिकेतील बेकायदा स्थलांतरितांवर कारवाई करण्याचा आदेशही त्यांनी जारी केला. अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करणार्‍यांना या आदेशामुळे मायदेशी पाठविण्यात येणार आहे. अमेरिकेत 7.50 लाख भारतीय बेकायदा वास्तव्य करीत असल्याचे समजते. ट्रम्प यांच्या आदेशामुळे त्यांची धाकधूक वाढली आहे. जगभरातून अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करीत असलेल्यांची संख्या 10 कोटींहून अधिक आहे.

केवळ स्त्री आणि पुरुषच

अमेरिकेतील लिंग आदर्शवादालाही झटका देत ट्रम्प यांनी अमेरिकेत आता फक्त स्त्री आणि पुरुष हे दोनच लिंग असतील, असा आदेश जारी केला. या आदेशामुळे तृतीयपंथीयांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.

जयशंकर पहिल्या रांगेत

ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये जयशंकर यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते. त्यामुळे या सोहळ्यात एकप्रकारे भारतीयांची छाप पडली. भारताच्या वतीने सोहळ्यामध्ये प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान मिळाल्याची भावना जयशंकर यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने विशेष दूत म्हणून या सोहळ्यास उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याची पोस्ट जयशंकर यांनी शेअर केली.

अब्जाधीशांची उपस्थिती लक्षवेधी

उपराष्ट्राध्यक्ष जेडी वॅन्स, पत्नी उषा वॅन्स, मुले विवेक, इवान, मिराबेल ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित होते. याशिवाय जगातील सर्वाधिक श्रीमंत अब्जाधीश एलॉन मस्क, मेटाचे जॉन झुकेरबर्ग, लॉरेन सांचेज, अमेझॉनचे जेफ बेझोस, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आदी अब्जाधीश सोहळ्यास उपस्थित होते.

* राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा साजरा करण्यासाठी अब्जाधीश मस्क यांनी हिटलरच्या स्टाईलमध्ये सॅल्युट मारला. या सोहळ्यात मस्क यांनी भाषणही केले. त्यानंतर नाझीच्या स्टाईलमध्ये समर्थकांना सॅल्युट मारला. मस्क यांच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे.

* अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यामध्ये भारताचा प्राचीन वारसा आणि संस्कृतीचे दर्शन घडवून आणले. नीता यांनी 18 व्या शतकातील दागिने घातले होते. तसेच कांचिपूरम साडीमध्ये वेशभूषा केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT