Donald Trump file photo
आंतरराष्ट्रीय

Donald Trump: आधी अणुकार्यक्रमावर चर्चा! इराणच्या नव्या प्रस्तावावर ट्रम्प नाराज; तीन अटी स्वीकारण्याची शक्यता कमी

इराणने मांडलेला नवा शांतता प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळून लावला आहे.

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन: इराणने मांडलेला नवा शांतता प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळून लावला आहे. इराणने सुचवलेल्या अटी आणि टप्प्याटप्प्याने राबवल्या जाणाऱ्या प्रक्रियेवर ट्रम्प यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, अण्वस्त्र कार्यक्रमाचा मुद्दा सर्वात आधी निकाली निघायला हवा, या भूमिकेवर अमेरिका ठाम असल्याचे सूत्रांनी सांगितले.

इराणचा 'थ्री-स्टेप' प्लॅन काय आहे?

इराणने संघर्षावर तोडगा काढण्यासाठी तीन टप्प्यांचा प्रस्ताव मांडला होता:

१. अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्धचे युद्ध थांबवून पुन्हा हल्ला न करण्याचे आश्वासन देणे.

२. अमेरिकेने लादलेली नाविक नाकेबंदी उठवणे आणि 'हॉर्मुझ'च्या सामुद्रधुनीसह महत्त्वाचे सागरी मार्ग व्यापारासाठी खुले करणे.

३. वरील दोन अटी पूर्ण झाल्यानंतरच इराण आपला अण्वस्त्र कार्यक्रम आणि युरेनियम संवर्धनाच्या हक्कांवर चर्चा करेल.

अमेरिकेचा आक्षेप: अण्वस्त्रे केंद्रस्थानीच हवीत

इराणला आधी युद्धविराम हवा असला, तरी अमेरिकेला मात्र अण्वस्त्रांचा मुद्दा प्रलंबित ठेवणे मान्य नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सल्लागारांसोबत झालेल्या बैठकीत स्पष्ट केले की, कोणत्याही कायमस्वरूपी करारासाठी इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम केंद्रस्थानी असणे आवश्यक आहे. हा मुद्दा शेवटच्या टप्प्यावर ढकलण्यास ट्रम्प यांनी स्पष्ट नकार दिला आहे.

"आम्ही त्यांना मोकळे सोडू शकत नाही. इराण कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रांच्या दिशेने पाऊल उचलणार नाही, याची खात्री देणाराच करार आम्हाला मान्य असेल."
मार्को रुबिओ, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव

संघर्ष वाढण्याची शक्यता

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी 'फॉक्स न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत इराणच्या भूमिकेवर टीका केली. इराणला अण्वस्त्र निर्मितीपासून रोखणे ही अमेरिकेचा पहिला उद्देश असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. इराणने मांडलेल्या प्रस्तावात सागरी सुरक्षा आणि युद्धाला प्राधान्य दिले असले, तरी ट्रम्प प्रशासनाने 'आधी अण्वस्त्रे, मगच इतर चर्चा' असे धोरण अवलंबल्याने पश्चिम आशियातील राजनैतिक कोंडी अधिक फुटण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT