वॉशिंग्टन/लास वेगास; वृत्तसंस्था : मला लोकांना मारायचे नाही. त्यामुळे युद्धापेक्षा इराणशी करार करणे मला अधिक पसंत आहे. मात्र, गरज पडल्यास अमेरिका कठोर कारवाई करण्यास मागे हटणार नाही, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लास वेगास येथील एका कार्यक्रमात बोलताना दिला.
ट्रम्प म्हणाले, ‘अलीकडील अमेरिकन लष्करी कारवाईमुळे इराणची मोठी हानी झाली आहे. आम्ही त्यांना जोरदार धक्का दिला आहे. तरीही युद्ध हा आमचा उद्देश नाही. शक्य असल्यास कराराद्वारे प्रश्न सोडवायचा आहे. आम्ही दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा हल्ला करण्यास सज्ज होतो. इराणने आम्हाला कृपया हल्ला करू नका, आपण चर्चा करूया, असा संदेश दिला. आता चर्चा सुरू आहे. पुढे काय होते ते पाहू, असेही ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प म्हणाले, अमेरिकेचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे इराणला अण्वस्त्रसंपन्न राष्ट्र होण्यापासून रोखणे. इराणला अण्वस्त्रे मिळू शकत नाहीत. याबाबत आमची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. पुढील ४८ तासांत परिस्थिती अधिक स्पष्ट होईल.
‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स म्हणाले की, इराणच्या राजकीय व्यवस्थेमध्ये मोठी फूट आहे. इराणमध्ये काही गट युद्ध समाप्त करण्याच्या बाजूने आहेत. तर, काही कट्टर गट संघर्ष सुरू ठेवण्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे अमेरिकेसाठी वाटाघाटी करणे अत्यंत कठीण आहे.
कुवेतने देशातील एकमेव इराणी शाळेचा परवाना रद्द केला. नवीन प्रवेश थांबवण्यात आले. पालकांना मुलांना इतर शाळांमध्ये दाखल करण्यास सांगण्यात आले. कुवेतवर इराणकडून हल्ले झाल्यानंतर हा निर्णय घेतला.
इराणमध्ये वाढती महागाई आणि आर्थिक अडचणींचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत असल्याचे चित्र आहे. दुकानांमधून ब्रेड, चीज आणि मांसासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत.
अमेरिका-इराण संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाज वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर इराण आणि ओमान यांच्यात समुद्री मार्ग पुन्हा सुरळीत करण्यासाठी चर्चा सुरू आहे. प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रस्तावित व्यवस्थेनुसार जहाजांना पर्शियन आखातात प्रवेश करण्यासाठी इराणच्या नियंत्रणाखालील मार्गाचा वापर करता येईल. बाहेर पडण्यासाठी ओमानच्या नियंत्रणाखालील मार्ग उपलब्ध करून दिला जाईल. मात्र, या करारासाठी अमेरिकेने इराणी बंदरांवरील निर्बंध किंवा नाकेबंदी हटवणे आवश्यक ठरू शकते.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई म्हणाले, दोन्ही देशांतील करार अंतिम टप्प्यात असून काही तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर संयुक्त निवेदन जारी केले जाईल. मात्र, काही तृतीय पक्षांनी अडथळा आणला नाही तरच ही प्रक्रिया पूर्ण होईल, असेही त्यांनी नमूद केले. हा अप्रत्यक्ष इशारा अमेरिकेला असल्याचे मानले जात आहे. इराणचे उपपरराष्ट्रमंत्री काझेम गरिबाबादी यांनीही जवळपास सर्व मुद्द्यांवर सहमती झाल्याचे सांगितले. ते म्हणाले की, होर्मुझबाबतच्या चर्चा केवळ इराण आणि ओमान यांच्यातील द्विपक्षीय चर्चा आहेत. या विषयावर अमेरिकेसोबत वाटाघाटी सुरू नाहीत.
येमेनच्या पश्चिम किनाऱ्याजवळ ‘एमएसव्ही फैझ नूर ओलिया’ हे भारतीय ध्वजाचे मालवाहू जहाज हल्ल्यात बुडाले. जहाजावर एकूण १४ कर्मचारी होते. त्यापैकी १३ भारतीय नागरिक आणि एक येमेनचा नागरिक होता. सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. लाल समुद्र आणि एडनच्या आखातातील वाढत्या हल्ल्यांमुळे व्यापारी जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.