वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कमी व्याज दरांमुळेच भारताचा जीडीपी विकास दर ७ टक्के झाला, असे कौतुक करत अमेरिकेनेही व्याज दर कमी केल्यास देशाचा विकास दर १५ ते २० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (दि. २०) व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना केला. त्यांनी अमेरिकन मध्यवर्ती बँकेच्या (फेडरल रिझर्व्ह) व्याज दर धोरणावर तीव्र टीका केली आहे.
व्हाईट हाऊसच्या साऊथ लॉनवर पत्रकारांशी बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फेडरल रिझर्व्ह अत्यंत राजकीय झाले आहे. जेव्हा जेव्हा अमेरिकेचे चांगले आर्थिक आकडे समोर येतात, तेव्हा ते व्याज दर कमी करण्याऐवजी वाढवतात. यामागे त्यांचा काहीतरी हेतू आहे. खरे तर याच्या उलट व्हायला हवे, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले. चांगल्या आर्थिक कामगिरीमुळे देशाची पत (क्रेडिट) सुधारते, त्यामुळे व्याज दर कमी करून विकासाला चालना द्यायला हवी, असेही ते म्हणाले.
महागाईचे आकडे आणि पार्श्वभूमी
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्याज दर कपातीची मागणी केली असली, तरी अमेरिकेतील महागाई अद्याप फेडरल रिझर्व्हच्या २ टक्क्यांच्या उद्दिष्टापेक्षा जास्त आहे. ट्रम्प यांच्या भाषणात नमूद केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये अमेरिकेचा वार्षिक वैयक्तिक उपभोग खर्च महागाई दर ३.६ टक्के होता, तर अन्न आणि ऊर्जा किमती वगळता ‘कोअर पीसीई’ महागाई दर ३.१ टक्के इतका नोंदवला गेला आहे. त्यामुळे महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी फेडरल रिझर्व्हने व्याज दर उच्च पातळीवर कायम ठेवले आहेत.
व्याज दर कमी करा, अमेरिकेचा जीडीपी २० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो
अमेरिकेच्या धोरणांची भारताशी तुलना करताना ट्रम्प म्हणाले की, तुम्ही भारताकडे पाहा, तिथे व्याज दर कमी आहेत आणि त्यांचा जीडीपी ७ टक्के आहे. जर आपणही असेच धोरण अवलंबले, तर अमेरिकेचा जीडीपी ४ टक्क्यांऐवजी १४, १५ किंवा अगदी २० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो आणि आपण देशाचे कर्जही वेगाने फेडू शकू. जागतिक अर्थव्यवस्थेत इतर देशांना यशस्वी करण्यात अमेरिकेचा मोठा वाटा असल्याने अमेरिकेतच सर्वात कमी व्याज दर असायला हवेत, असा युक्तिवादही त्यांनी केला.