पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या सार्वजनिक वादविवादानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला देण्यात येणारी सर्व लष्करी मदत थांबवण्याचे आदेश दिल्याचे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे. दरम्यान, यावर झेलेन्स्की यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
"अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सर्व लक्ष शांतता प्रस्थापित करण्यावर आहे. आपल्या भागीदारांनीही त्या ध्येयासाठी वचनबद्ध असणे आवश्यक आहे. आम्ही आमची मदत रोखत आहोत. झेलेन्स्की रशियासोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यास तयार आहेत की नाही, याचा आढावा ट्रम्प घेत आहेत." असे सूत्रांनी म्हटले आहे. ट्रम्प प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने 'फॉक्स न्यूज'ला सांगितले की, "अमेरिकेकडून युक्रेनला होणारी मदत कायमची बंद नाही; हा एक विराम आहे."
युक्रेनला अमेरिकेच्या लष्करी मदतीमध्ये कोणताही मोठा बदल झाल्यास देशाच्या संरक्षणावर विनाशकारी परिणाम होऊ शकतो. युक्रेनियन अधिकाऱ्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, युक्रेनकडे रशियाची लढण्यासाठी उन्हाळ्यापर्यंतचीच शस्त्रसाठा आहे.
अमेरिका आणि युक्रेन यांच्यात खनिज करारावर स्वाक्षरीची चर्चा सुरु आहे. या करारामुळे अमेरिकेला युक्रेनमधील संसाधनांमध्ये हस्तक्षेप करण्याची संधी मिळेल. तसेच या करारानंतर दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील, अशी अमेरिकेतील विश्लेषकांचे मत आहे. मात्र शुक्रवार, २८ फेब्रुवारी रोजी ट्रम्प प्रशासनाने झेलेन्स्कीवर सुरक्षा हमींबद्दल चर्चा सुरू करून आपल्या मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला तेव्हा परिस्थिती झपाट्याने बिघडली आहे. आता अमेरिकेने लष्करी मदत थांबवल्यानंतर युक्रेनच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की ( zelensky) यांच्यात ओव्हल कार्यालयामध्ये शुक्रवारी (दि. २८ फेब्रुवारी) भेट झाली. ट्रम्प आणि व्हेन्स यांनी युक्रेनला दिलेल्या अमेरिकेच्या मदतीबद्दल झेलेन्स्की यांनी पुरेशी कृतज्ञता व्यक्त केली नाही, असा आरोप केला आणि त्यांच्या इच्छेनुसार शांतता करार मान्य करण्यासाठी दबाव टाकला. या चर्चेदरम्यान आवाज चढले, तणाव वाढला आणि ट्रम्प यांनी थेट धमकी दिली की, झेलेन्स्की यांनी त्यांचा प्रस्ताव मान्य केला नाही, तर अमेरिका युक्रेनला पूर्णतः सोडून देईल. झेलेन्स्की यांना मध्येच थांबवत व्हेन्स म्हणाले की, ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांसमोर स्वतःची बाजू मांडणे हा अनादर आहे. त्यांनी ट्रम्प यांचे नेतृत्व मान्य करून त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्याचवेळी ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना सांगितले, तुमची परिस्थिती चांगली नाही. तुम्ही तिसर्या महायुद्धासोबत जुगार खेळत आहात. काही मिनिटांनंतर, ट्रम्प यांनी उर्वरित भेटच रद्द करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की शांततेसाठी तयार नाहीत; कारण त्यांना वाटते की, अमेरिकेच्या सहभागामुळे त्यांना वाटाघाटींमध्ये मोठा फायदा मिळतो. ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडियावर लिहिले, मला कोणालाही फायदा द्यायचा नाही, मला शांतता हवी आहे. त्यांनी ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकेचा अनादर केला. ते जेव्हा शांततेसाठी तयार असतील, तेव्हा परत येऊ शकतात. यानंतर, झेलेन्स्की काही वेळातच व्हाईट हाऊस सोडून गेले.