वॉशिंग्टन डीसी; वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची ताकद वापरून स्वतःचा आणि कुटुंबाचा व्यवसाय वाढवल्याचा गंभीर आरोप न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. या अहवालानुसार, जानेवारी 2025 मध्ये पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारून व्हाइट हाऊसमध्ये परतल्यानंतर अवघ्या एक वर्षात ट्रम्प यांच्या वैयक्तिक संपत्तीत किमान 12,810 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. काही व्यवहार सार्वजनिक न केल्याने ही कमाई याहून अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गुरुवारी दावोस येथे झालेल्या कार्यक्रमात ट्रम्प यांनी अमेरिकेला ‘पुन्हा महान आणि श्रीमंत’ बनवत असल्याचा दावा केला. त्यांच्या धोरणांमुळे आणि टॅरिफमुळे सुमारे 16.48 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक देशात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार टॅरिफ वॉरचा आर्थिक भार अमेरिकन ग्राहकांवर पडला असून त्याचा थेट फायदा ट्रम्प यांच्या खासगी व्यवसायांना झाला.
विदेशी प्रकल्पांतून मोठी कमाई
ट्रम्प ऑर्गनायझेशन सध्या 20 पेक्षा अधिक विदेशी रिअल इस्टेट प्रकल्प चालवत आहे. ‘ट्रम्प’ नावाचे लायसन्स देऊन त्यांनी सुमारे 210 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ओमानमधील लक्झरी हॉटेल आणि सौदी अरेबियातील गोल्फ कोर्स यांचा त्यात समावेश आहे.
टॅरिफ बदल्यात गोल्फ प्रकल्प
अहवालानुसार, व्हिएतनामवर लादलेला 46 टक्के टॅरिफ कमी करून 20 टक्के करण्याच्या बदल्यात ट्रम्प ऑर्गनायझेशनला हनोई येथे 1.5 अब्ज डॉलर्सचा गोल्फ प्रकल्प सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. या प्रकल्पासाठी स्थानिक कायदेही डावलल्याचा आरोप आहे. इंडोनेशियामध्येही ट्रम्प ब्रँडेड गोल्फ क्लब सुरू झाला असून बालीमध्ये रिसॉर्ट प्रकल्प सूचीबद्ध आहेत.
ट्रम्प कुटुंबाची सर्वात मोठी कमाई क्रिप्टोकरन्सीमधून झाली. ‘वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल’ आणि एका मीम कॉईनमधून किमान 867 मिलियन डॉलर्स मिळाल्याचे सांगितले जाते.
भारतात 8 ट्रम्प ब्रँडेड प्रकल्प
वॉल स्ट्रीट जर्नलच्या माहितीनुसार, भारतात सध्या 8 ट्रम्प ब्रँडेड प्रकल्प सुरू किंवा नियोजित आहेत. यामध्ये निवासी टॉवर्स, हॉटेल्स आणि व्यावसायिक इमारतींचा समावेश आहे. पुण्यात उभारला जाणारा ‘ट्रम्प वर्ल्ड सेंटर’ हा भारतातील पहिला ट्रम्प ब्रँडेड कमर्शियल प्रकल्प असून, त्यातून ट्रम्प यांना 289 मिलियन डॉलर्सपेक्षा अधिक कमाई होण्याचा अंदाज आहे. गुरुग्राममध्येही निवासी आणि हॉटेल प्रकल्प सूचीबद्ध आहेत. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी ट्रम्प यांनी भारताला ‘डेड इकॉनॉमी’ असे संबोधले होते.