trump-defeats-biden-presidential-debate
डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेनना हरवले File Photo
आंतरराष्ट्रीय

Presidential debate|डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेनना हरवले

पुढारी वृत्तसेवा
अटलांटा: अनिल टाकळकर

अमेरिकेत शुक्रवारी झालेल्या पहिल्या अध्यक्षीय वादविवादात राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभूत केले. चार वर्षांपूर्वी झालेल्या अशाच वादविवादात बायडेन यांनी ट्रम्प यांना पराभूत केले होते. त्याचा सूडच जणू ट्रम्प यांनी उगवला.

भाषणादरम्यान व्यक्तींची नावे, मुद्दे विसरणे, चालताना अडखळून पडणे असे आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीत बायडेन यांच्याकडून अनेकदा घडल्याने, डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने त्यांच्या उमेदवारीची पुनरावृत्ती आधीच अडचणीत आलेली असताना या डिबेटमधील पराभवाने ८१ वर्षांच्या बायडेन यांच्या उमेदवारीचा दावा आणखीच कमकुवत झालेला आहे. ७५ मिनिटे ही डिबेट चालली.

अमेरिकेतील 'न्यूयॉर्क टाईम्स', 'वॉशिंग्टन पोस्ट' आणि 'सीएनएन' या बड्या माध्यम संस्थांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत ट्रम्प यांना विजेता घोषित करण्यात आले. वादविवादादरम्यान आपला मुद्दा मांडताना बायडेन वारंवार अडखळत होते. सतत खोकत होते आणि महत्त्वाचे म्हणजे ट्रम्प यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देणे त्यांना शक्य झाले नाही.

'न्यूयॉर्क टाईम्स'च्या मते, बायडेन यांच्या या पराभवानंतर डेमोक्रॅटिक पक्षातील अन्य नेत्यांकडून राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून बायडेन यांच्याविरोधात लॉबिंग बळकट झालेली आहे. बायडेन यांची अवस्था बघता ते पुढील ४ महिन्यांपर्यंत चालणारी प्रचार मोहीम कशी पार पाडतील, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

माझी प्रकृती बरी नव्हती. घसा बसलेला होता. मुख्य म्हणजे जो माणूस रेटून खोटे बोलतो, त्याच्याशी वाद घालणे कठीणच असते. -
-जो बायडेन, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका
बायडेन यांनी अमेरिकेच्या व्यापक हिताचे असे काहीही केलेले नाही. ते बोलू शकत नाहीत, असे नाही; पण त्यांच्याकडे बोलायलाच काही नाही.
-डोनाल्ड ट्रम्प, माजी राष्ट्राध्यक्ष, अमेरिका
वय झालेले असले तरी माझ्यात अमेरिकेचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे, हे सिद्ध करण्याची संधी बायडेन यांनी गमावली.
- केट बेडिंगफिल्ड, बायडेन यांची माजी संवाद सल्लागार
SCROLL FOR NEXT