Trump company money laundering investigation | ट्रम्प यांच्या कंपनीची खाती मनी लाँडरिंग तपासणीनंतरच बंद 
आंतरराष्ट्रीय

Trump company money laundering investigation | ट्रम्प यांच्या कंपनीची खाती मनी लाँडरिंग तपासणीनंतरच बंद

पुढारी वृत्तसेवा

सॅन फ्रान्सिस्को; वृत्तसंस्था : अमेरिकेची प्रमुख वित्तीय संस्था असलेल्या ‘कॅपिटल वन फायनान्शियल'ने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'ट्रम्प ऑर्गनायझेशन'ने दाखल केलेल्या खटल्याला शुक्रवारी न्यायालयात जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ट्रम्प यांच्या कौटुंबिक कंपनीची बँक खाती राजकीय किंवा धार्मिक कारणांमुळे (डी बँकिंग) बंद करण्यात आल्याचा आरोप बँकेने ठामपणे फेटाळून लावला आहे. बँकेच्या अँटी मनी लाँडरिंग तज्ज्ञांच्या टीमने कित्येक महिने केलेल्या सखोल विश्लेषणानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे बँकेने अर्जात स्पष्ट केले आहे.

कॅपिटल वनने निवेदनात ट्रम्प ऑर्गनायझेशनवर बेकायदेशीर मनी लाँडरिंगचा थेट आरोप केलेला नाही. मात्र कंपनीच्या बँक खात्यांमधील व्यवहारांचे स्वरूप हे फेडरल बँकिंग मार्गदर्शक तत्त्वांनुसार संशयास्पद किंवा विशेष लक्ष देण्यायोग्य श्रेणीत येत होते. बँकेच्या धोरणांनुसार आणि सरकारी नियामक नियमांच्या चौकटीत राहूनच ही खाती बंद करण्याचा निर्णय घेतला होता, असे बँकेने न्यायालयाला सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या प्रशासनाने मोठ्या बँकांवर दबाव वाढवला आहे.

मार्च २०२१ ची कारवाई आणि ट्रम्प यांचा दावा

कॅपिटल वनने मार्च २०२१ मध्ये ट्रम्प यांच्याशी संबंधित ३०० हून अधिक बँक खाती बंद करण्याची नोटीस जारी केली होती. या कारवाईविरोधात मार्च २०२५ मध्ये ट्रम्प ऑर्गनायझेशन आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र एरिक ट्रम्प यांनी फ्लोरिडातील फेडरल न्यायालयात बँकेविरुद्ध याचिका दाखल केली होती. ६ जानेवारी २०२१ रोजी अमेरिकन कॅपिटलवर झालेल्या हिंस्र घटनेनंतर राजकीय वातावरणाचा फायदा घेण्यासाठी आणि बँकेच्या ‘वोक’ विचारसरणीमुळे ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप ट्रम्प यांच्या बाजूने करण्यात आला होता. मात्र, मायमी येथील फेडरल न्यायालयाने यापूर्वी ट्रम्प यांच्या दोन तक्रारी फेटाळून लावल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT