Trump - xi jinping meeting | ट्रम्प - जिनपिंग यांची पुढील आठवड्यात भेट 
आंतरराष्ट्रीय

Trump - xi jinping meeting | ट्रम्प - जिनपिंग यांची पुढील आठवड्यात भेट

चर्चेत दोन महासत्तांमधील स्पर्धेची पुढील दिशा ठरण्याची शक्यता

अरुण पाटील

अनिल टाकळकर

वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे सर्वोच्च नेते शी जिनपिंग यांची पुढील आठवड्यात बीजिंगमध्ये होणारी अत्यंत महत्त्वपूर्ण शिखर बैठक जगातील दोन महासत्तांमधील स्पर्धेच्या पुढील टप्प्याला दिशा देणारी ठरू शकते.

गुरुवारी सुरू होणार्‍या दोन दिवसांच्या या बैठकीत ट्रम्प आणि शी जिनपिंग इराणमधील युद्ध, व्यापार, तैवान आणि इतर वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा करतील, अशी अपेक्षा आहे. ट्रम्प आणि जिनपिंग यांची शेवटची भेट ऑक्टोबरमध्ये दक्षिण कोरियात झाली होती. त्या वेळी दोन्ही नेत्यांनी आपापसातील तीव्र व्यापारयुद्ध थांबवण्याचे मान्य केले होते. या व्यापारयुद्धात अमेरिकेने चिनी वस्तूंवर तीन अंकी दराने शुल्क (टॅरिफ) लादले होते, तर बीजिंगने दुर्मीळ खनिजांच्या (रेअर अर्थ्स) जागतिक पुरवठ्यावर निर्बंध आणण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यातील ही भेट त्या बैठकीनंतर निर्माण झालेली अस्वस्थता, तात्पुरता समेट टिकणार की नाही, हे ठरवू शकते.

दोन्ही नेत्यांच्या शेवटच्या भेटीनंतर जगात बरेच काही बदलले आहे. ट्रम्प आता इराणबरोबरच्या युद्धात अडकले आहेत. इराण हा मध्यपूर्वेतील चीनचा सर्वात जवळचा भागीदार मानला जातो. या युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट निर्माण झाले असून, अमेरिकेची आशियातील लष्करी ताकद काही प्रमाणात दुसरीकडे वळवावी लागली आहे. या युद्धामुळे अमेरिकेच्या शस्त्रसाठ्यातही घट झाली आहे. त्यामुळे काही चिनी विश्लेषक अमेरिकेची तैवानचे संरक्षण करण्याची क्षमता कितपत प्रभावी राहिली आहे, यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. तैवान हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार मानला जातो.

दुसरीकडे, शी जिनपिंग यांनाही स्वतःच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंदावलेली आर्थिक वाढ, वाढलेल्या ऊर्जा किमती आणि जागतिक मंदीची शक्यता यामुळे चीनच्या निर्यात-आधारित अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण झाला आहे.

चर्चेच्या टेबलावर काय असणार?

ट्रम्प आणि शी जिनपिंग व्यापारावर चर्चा करू शकतात. त्यात एकमेकांच्या देशांतील संभाव्य गुंतवणुकीचाही समावेश असेल. सध्या अमेरिकन विश्लेषक ज्याला फाइव्ह बीज म्हणतात, त्यावर भर देत आहे. त्यामध्ये चीनने बोईंग कंपनीची विमाने खरेदी करणे, अमेरिकन गोमांस (बीफ) आणि सोयाबीन आयात करणे, तसेच गुंतवणूक मंडळ आणि व्यापार मंडळ स्थापन करणे यांचा समावेश आहे. या दोन संस्थांमुळे अमेरिका आणि चीन यांच्यात राष्ट्रीय सुरक्षेला धोका न पोहोचवणार्‍या आर्थिक देवाणघेवाणीची क्षेत्रे निश्चित केली जातील.

चीनकडून थ्री टीजवर भर दिला जात आहे - टॅरिफ, टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान) आणि तैवान. बीजिंग तैवानला चीनच्या भूभागाचा भाग मानते. चीन गेल्या वर्षी झालेल्या व्यापार तहाची मुदत वाढवण्याचा आग्रह धरण्याची शक्यता आहे. तसेच औद्योगिक क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक असलेल्या प्रगत सेमिकंडक्टरवरील निर्यात निर्बंध सैल करण्याची मागणीही चीन करू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

संभाव्य निष्कर्ष काय?

ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्याशी असलेल्या संबंधांबद्दल नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. ते जिनपिंग यांना मित्र म्हणतात आणि अमेरिकेत चिनी गुंतवणूक वाढल्याची घोषणा करण्यास उत्सुक आहेत. तथापि, या बैठकीत मोठा आर्थिक करार होईल किंवा दोन्ही देशांतील खोलवरचे मतभेद मिटतील, अशी अपेक्षा फारशी नाही. त्याऐवजी गुंतवणुकीसंबंधी काही मर्यादित करार आणि गेल्या वर्षीच्या तात्पुरत्या व्यापार तहाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता अधिक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT