वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यातील बहुप्रतीक्षित शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. अमेरिकेच्या लष्करी तळावर लढाऊ विमानांच्या सलामीने आणि भव्य स्वागताने या भेटीची सुरुवात झाली. पण युक्रेन युद्ध थांबवण्याबाबत कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने ही भेट अखेरीस निष्फळ ठरली.
अलास्का येथील जॉईंट बेस एल्मेंडॉर्फ-रिचर्डसन येथे सुमारे अडीच तास चाललेल्या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. मात्र, पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांना उभयतांनी उत्तरे दिली नाहीत. आमची बैठक अत्यंत फलदायी झाली आणि अनेक मुद्द्यांवर सहमती झाली आहे. फक्त काही मुद्दे शिल्लक आहेत. आम्ही अंतिम निर्णयापर्यंत पोहोचू शकलो नाही; पण लवकरच पोहोचण्याची शक्यता आहे, असे ट्रम्प म्हणाले. दुसरीकडे, 2022 पासून युक्रेनवरील आक्रमणानंतर पाश्चात्त्य देशांनी वाळीत टाकलेल्या पुतीन यांनी अमेरिकेत झालेल्या स्वागताबद्दल ट्रम्प यांचे आभार मानले आणि पुढची बैठक मॉस्कोमध्ये होऊ शकते, असे मिश्कीलपणे सुचवले.
या शिखर परिषदेसाठी अमेरिकेत पोहोचलेल्या पुतीन यांचे ‘रेड कार्पेट’ पसरून स्वागत करण्यात आले. इतकेच नव्हे तर त्यांना विमानतळावरून बैठकीच्या ठिकाणापर्यंत ट्रम्प यांच्या अध्यक्षीय लिमोझिनमधून नेण्यात आले. या चर्चेत दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले होते. बैठकीनंतर पुतीन यांनी अमेरिका आणि रशिया यांच्यातील ऐतिहासिक संबंधांचे कौतुक केले. ते म्हणाले की, जर 2020 च्या निवडणुकीत ट्रम्प जिंकले असते, तर युक्रेन युद्ध झालेच नसते, या ट्रम्प यांच्या मताशी ते सहमत आहेत. त्यांच्या या विधानामुळे ट्रम्प नक्कीच खूश झाले असतील. मात्र, या चर्चेतून युक्रेनमध्ये युद्धविराम लागू करण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
या भेटीमुळे पुतीन यांना कोणताही ठोस निर्णय न देता किंवा कोणतीही मोठी किंमत न मोजता आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा आपली प्रतिमा उंचावण्याची संधी मिळाली. गेल्या 10 वर्षांत प्रथमच अमेरिकेच्या भूमीवर त्यांचे स्वागत झाले, जे रशियाला एकाकी पाडण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्याचे द्योतक मानले जात आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी सोशल मीडियावर म्हटले की, गेली तीन वर्षे पाश्चात्त्य देश रशियाच्या एकाकीपणाबद्दल बोलत होते आणि आज त्यांनी रशियन राष्ट्राध्यक्षांसाठी अमेरिकेत रेड कार्पेट अंथरलेले पाहिले.
दोन्ही नेत्यांनी चर्चा ‘सकारात्मक’ झाल्याचे म्हटले असले तरी कोणत्याही ठोस निर्णयाची घोषणा न झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 15 मिनिटांपेक्षा कमी चाललेल्या पत्रकार परिषदेत केवळ औपचारिक विधाने करण्यात आली, त्यामुळे बैठकीतील निराशा स्पष्टपणे दिसून आली.
ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की आणि नाटोच्या नेत्यांशी सोमवारी पुढील टप्प्यात चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, या भेटीतून ठोस काहीच निष्पन्न न झाल्याने युक्रेन युद्धाचे भवितव्य अजूनही अंधारातच आहे.