Trump visa policy 2025 visa ban Chinese students in US
वॉशिंग्टन (अमेरिका): ट्रम्प प्रशासनाने परदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसा धोरणात मोठा बदल करत एक आक्रमक पाऊल उचलले आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका चीनमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसणार असून, त्यामुळे तब्बल तीन लाखांहून अधिक चिनी विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे भविष्य धोक्यात आले आहे. यामुळे भारतीय विद्यार्थ्यांनाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
2023-24 शैक्षणिक वर्षात चीनमधून 2,77,398 विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी आले. हा भारतानंतरचा सर्वात मोठा विद्यार्थी समूह आहे. भारतातील विद्यार्थ्यांची संख्या या कालावधीत सर्वाधिक होती. पण ट्रम्प प्रशासनाच्या नव्या धोरणामुळे आता या आकडेवारीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी जाहीर केले की, "चीनमधील विद्यार्थ्यांचे, विशेषतः जे चायनीज कम्युनिस्ट पार्टी (CCP) शी संबंधित आहेत किंवा संवेदनशील अभ्यासक्रम शिकत आहेत, त्यांचे व्हिसा रद्द करण्यात येतील."
या नव्या निर्देशानुसार, जगभरातील अमेरिकन दुतावास आणि कॉन्सुलेट्सना चिनी विद्यार्थ्यांच्या व्हिसा अपॉईंटमेंट्स तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता व्हिसा प्रक्रियेत उमेदवाराच्या सोशल मीडिया खात्यांचे बारकाईने परीक्षण करण्यात येणार आहे.
रुबिओ यांनी दावा केला की, त्यांनी हजारो परदेशी विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द केले असून, त्यात इस्रायलविरोधी आंदोलने करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्डसारख्या प्रतिष्ठित विद्यापीठांवर टीका करत, ते भेदभावाधारीत विचारसरणी पसरवणारे आणि अँटीसेमिटिझमला प्रोत्साहन देणारे असल्याची टीका केली. काही काळासाठी फेडरल संशोधन निधी रोखून ठेवला. हार्वर्डने या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले असून, सध्या या आदेशाची अंमलबजावणी थांबवण्यात आली आहे.
या निर्णयावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी नाराजी व्यक्त करत अमेरिकेला जागतिक शिक्षण व्यवस्था सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले. "आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे कायदेशीर हक्क आणि हित सुरक्षित ठेवणे अमेरिका सरकारचे कर्तव्य आहे," असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी स्पष्ट केले की, "विद्यार्थी असो वा पर्यटक, प्रत्येक व्हिसा अर्जदाराची कसून तपासणी केली जाईल." कोणत्याही देशातून येणारे नागरिक अमेरिकेच्या कायद्यांचे पालन करतात की नाही, याची खात्री करूनच प्रवेश दिला जाईल.
भारतीय विद्यार्थी सध्या अमेरिकेत सर्वाधिक संख्येने शिक्षण घेत आहेत. त्यामुळे व्हिसा मुलाखतींवरील निर्बंधांचा भारतीय विद्यार्थ्यांवरही परिणाम होणार आहे, विशेषतः जे विद्यार्थी या वर्षीच्या शैक्षणिक सत्रात प्रवेश घेण्यासाठी तयारी करत आहेत त्यांना याचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे.
आगामी काळात विद्यार्थ्यांनी अमेरिकेच्या या नव्या धोरणाचा अभ्यास करून आपले नियोजन करणे अत्यावश्यक ठरणार आहे.