US Deportation | ट्रम्प प्रशासन १८ हजार भारतीयांना परत पाठवणार 
आंतरराष्ट्रीय

US Deportation | ट्रम्प प्रशासन १८ हजार भारतीयांना परत पाठवणार

अपील किंवा वकील नियुक्तीची संधीही नाही : जोरदार शोध मोहीम सुरू

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : कोणत्याही दस्तऐवजाविना अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या १८ हजार भारतीयांना अमेरिकेतून भारतात पाठवून देण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या प्रमाणात हद्दपारी मोहीम सुरू करण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात भारतीयांना अपील, युक्तिवाद किंवा वकील नियुक्त करण्याची संधी देण्यात आलेली नाही. बेकायदा वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचा छडा लावण्यासाठी शोध मोहीम हाती घेतली आहे.

मी गेल्या ३० वर्षांपासून अमेरिकेतील भारतीय नागरिकांचे खटले लढत आहे. विनाकागदपत्रे राहणाऱ्या कोणत्याही भारतीयाला त्याची बाजू मांडण्यासाठी संधी दिली जात होती. आता छापेमारीनंतर लोकांना थेट डिटेन्शन सेंटरला पाठवले जात आहे, असे न्यूयॉर्कच्या इमिग्रेशन अटर्नी ग्रेग सिस्किंड यांनी म्हटले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, अमेरिकेत संघ राज्यामुळे प्रत्येक राज्यात मानवाधिकारांशी संबंधित वेगवेगळे कायदे आहेत. मात्र, आता तपास संस्था कोणत्याही राज्यात जाऊन कारवाई करत आहेत.

डिटेन्शन सेंटर्सची निर्मिती

ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांना ठेवण्यासाठी एल पासो (टेक्सास) आणि कॅलिफोर्नियामध्ये विशेष गोदाम खरेदी करून त्यावर अंदाजे १६,५०० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यांचे रुपांतर डिटेन्शन सेंटरमध्ये करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी ३५६७ भारतीयांची बेड्या घालून परत पाठवणी

अमेरिकेने २०२५ मध्ये ३५६७ भारतीय नागरिकांना बेड्या घालून परत पाठवले होते. ही माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली होती. तसेच चालू वर्षात म्हणजे २०२६ च्या जूनपर्यंत १०७६ भारतीयांना अमेरिकेतून परत पाठवण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT