donald trump  file photo
आंतरराष्ट्रीय

US-Israel-Iran War: "हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करा, अन्यथा वीज प्रकल्प उद्ध्वस्त करू!" ट्रम्प यांचा इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम

‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ हा सागरी मार्ग ४८ तासांच्या आत पूर्णपणे खुला न केल्यास इराणचे वीज प्रकल्प जमीनदोस्त करण्याची थेट धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

मोहन कारंडे

US-Israel-Iran War:

वॉशिंग्टन: जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ हा सागरी मार्ग ४८ तासांच्या आत पूर्णपणे खुला न केल्यास इराणचे वीज प्रकल्प जमीनदोस्त करण्याची थेट धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. शनिवारी सोशल मीडियाद्वारे दिलेल्या या इशाऱ्यामुळे आखाती देशांमधील युद्ध आता अधिक भीषण वळणावर पोहोचले आहे.

‘सर्वात मोठ्या प्रकल्पापासून सुरुवात करू’

ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "जर इराणने ४८ तासांच्या आत कोणत्याही अटीशिवाय हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही, तर युनायटेड स्टेट्स इराणच्या विविध वीज प्रकल्पांना लक्ष्य करेल. आम्ही त्यांच्या सर्वात मोठ्या वीज प्रकल्पापासून ही कारवाई सुरू करू आणि ते पूर्णपणे उद्ध्वस्त करू."

युद्धाचा चौथा आठवडा: युरोपवरही सावट

गेल्या चार आठवड्यांपासून सुरू असलेल्या या युद्धाची व्याप्ती आता मध्यपूर्वेच्या बाहेरही पसरू लागली आहे. इराणने पहिल्यांदाच ४,००० किलोमीटर पल्ल्याच्या दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करत दिएगो गार्सिया येथील अमेरिका आणि ब्रिटनच्या संयुक्त लष्करी तळावर हल्ला केला आहे.

इस्रायली अधिकारी इयाल झमीर यांनी याबाबत चिंता व्यक्त करताना सांगितले की, "इराणची ही क्षेपणास्त्रे केवळ इस्रायलसाठी नसून त्यांचा पल्ला बर्लिन, पॅरिस आणि रोमसारख्या युरोपीय राजधानींपर्यंत आहे. ही शहरे आता थेट इराणच्या निशाण्यावर आहेत."

अणू केंद्रांवर हल्ले आणि मोठी जीवितहानी

दुसरीकडे, शनिवारी सकाळी अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्याने इराणमधील 'नतांझ' या अणू समृद्धीकरण केंद्रावर मोठा हल्ला केल्याचे वृत्त इराणी माध्यमांनी दिले आहे. या संघर्षात आतापर्यंत इराणमध्ये २,००० हून अधिक नागरिक आणि सैनिकांना प्राण गमवावे लागले आहेत, तर इराणच्या प्रतिहल्ल्यात इस्रायलमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

हॉर्मुझच्या कोंडीचा जगाला फटका

जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी २० टक्के वाहतूक हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. गेल्या काही आठवड्यांपासून इराणने या मार्गावर निर्बंध आणल्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. यामुळे जागतिक ऊर्जा संकट निर्माण होण्याची भीती असून, भारतासह २० हून अधिक देशांनी हा मार्ग सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT