Cyclone Narelle Australia
ऑस्ट्रेलिया: रौद्ररूप धारण केलेल्या 'नॅरेली' चक्रीवादळाने आज पश्चिम ऑस्ट्रेलियाला जोरदार तडाखा दिला. चक्रीवादळामुळे या भागात निसर्गाचे एक विलक्षण पण धडकी भरवणारे रूप पाहायला मिळाले. वादळाने उडालेल्या लाल मातीमुळे संपूर्ण आकाश गडद लाल रंगाचे झाले होते.
या नैसर्गिक आपत्तीचा ऑस्ट्रेलियातील नैसर्गिक वायू प्रकल्पांना मोठा फटका बसला असून उत्पादन थांबवले आहे. यामुळे आधीच गॅस टंचाईचा सामना करणाऱ्या जगासमोर आणखी भीषण परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पश्चिम ऑस्ट्रेलियातील 'शार्क बे' परिसरात आज सकाळी लोक झोपेतून उठले तेव्हा त्यांना चकित करणारे दृश्य दिसले. संपूर्ण आकाश रक्तासारखे लाल झाले होते. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी याला विनाशाची सुरूवात असे म्हटले आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, या भागातील मातीमध्ये लोह खनिजाचे प्रमाण अधिक आहे. चक्रीवादळाच्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ही लाल धूळ आकाशात उडाली आणि प्रकाशाच्या विकिरण प्रक्रियेमुळे आकाश लाल रंगाचे दिसू लागले. दरम्यान, सोशल मीडियावर अनेकांनी हे व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला, मात्र स्थानिक नागरिकांनी हे दृश्य वास्तव असल्याचे स्पष्ट केले आहे.
नॅरेली चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका ऑस्ट्रेलियातील नैसर्गिक वायू उद्योगाला बसला आहे. जगातील एकूण एलएनजी उत्पादनापैकी ५ टक्के वाटा असलेल्या शेवरॉन आणि वूडसाइड या कंपन्यांच्या प्रकल्पांमधील कामकाज ठप्प झाले आहे. शेवरॉन कंपनीच्या 'व्हीटस्टोन' प्लॅटफॉर्म आणि 'गॉरगॉन' प्रकल्पातील उत्पादन तांत्रिक बिघाडामुळे थांबवण्यात आले आहे. तर वूडसाइड कंपनीच्या 'करारा' गॅस प्रकल्पालाही चक्रीवादळाचा फटका बसला आहे.
२० मार्च रोजी क्वीन्सलँडमध्ये ४ थ्या श्रेणीचे तीव्र चक्रीवादळ म्हणून नॅरेली धडकले होते. नॉर्दर्न टेरिटरी पार करून हे वादळ पश्चिम ऑस्ट्रेलियात पोहोचले. शनिवारी या वादळाची तीव्रता काहीशी कमी झाली असली, तरी ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली असून हजारो नागरिक अंधारात आहेत.