Guinness World Record ब्राझीलमधील तीन सख्ख्या बहिणींनी त्यांच्यातील अतूट प्रेमाच्या आणि जिव्हाळ्याच्या जोरावर दीर्घायुष्य जगण्याचा एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. जिवंत असलेल्या तीन भावंडांच्या एकत्रित वयाचा हा एक ऐतिहासिक विक्रम ठरला आहे. आजही या तिन्ही बहिणी एकमेकांच्या अतूट प्रेम व सहकार्यांने सुखी व आनंदी जिवन जगत आहेत. या तिघींचा गिनीज वर्ल्ड बुकने विषेश सन्मान केला आहे.
दीर्घायुष्याची नोंद ठेवणाऱ्या 'लॉन्जेव्हीक्वेस्ट' (LongeviQuest) या संस्थेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ब्राझीलमध्ये राहणाऱ्या या तीन बहिणींचे एकत्रित वय ३१६ वर्षे आणि ३०२ दिवस इतके झाले आहे. वृद्धापकाळातील तीन बहिणींच्या दीर्घायुष्याचे रहस्य त्यांच्यातील अतूट बंधाला जाते. अशी माहिती गिनीज बुक ऑफ वर्ल्डने दिली आहे.
झुलिना डी देउस नुनेस, झोराइडे डी देउस मोटा आणि लेविटा डी देउस नुनेस अशी या तिन्ही बहिणींचे नाव आहे. या तिन्ही बहीणी ब्राझिलची राजधानी रिओ डी जनेरियो येथे वास्तव्यास आहेत.
तिन्ही बहिणी व त्यांचे वय
लेविटा द देउस नुनेस (Leavita da Deus Nunes): वय १०९ वर्षे (मोठी बहीण)
झोराइदे द देउस मोटा (Zoraide da Deus Mota): वय १०४ वर्षे (मधली बहीण)
झुलिना द देउस नुनेस (Zulina da Deus Nunes): वय १०३ वर्षे (धाकटी बहीण)
या तिघींमध्ये सर्वात मोठ्या असलेल्या लेविटा यांचा जन्म ७ जून १९१७ रोजी झाला होता. त्या आपल्या एकूण आठ भावंडांमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या आहेत. त्यांचे आई-वडील शेतात काम करत असल्यामुळे, अत्यंत लहान वयातच लेविटा यांच्यावर घरातील कामकाज सांभाळण्याची आणि आपल्या लहान भावंडांची काळजी घेण्याची मोठी जबाबदारी आली होती. त्यांनी ती जबाबदारी अत्यंत प्रेमाने पार पाडली.
दिर्घायुष्याचे रहस्य : 'अतूट कौटुंबिक बंध'
गेल्या अनेक दशकांपासून या तिन्ही बहिणींनी एकमेकींची साथ सोडलेली नाही. आयुष्यात आलेल्या अनेक चढ-उतारांच्या आणि कठीण काळात त्यांनी एकमेकींना नेहमीच आधार दिला. 'लॉन्जेव्हीक्वेस्ट'च्या तज्ज्ञांच्या मते, त्यांचे हे दीर्घायुष्य केवळ चांगल्या आरोग्यामुळे नाही, तर त्यांच्यातील मानसिक समाधान, एकमेकींबद्दलचे प्रेम आणि कौटुंबिक जिव्हाळा यांमुळे शक्य झाले आहे. या तिन्ही बहिणींचा हा विक्रम सध्या जगभरात चर्चेचा विषय बनला असून, कौटुंबिक एकत्रिकरणाचे आणि प्रेमाचे हे एक आदर्श उदाहरण मानले जात आहे.