Indian Missing In Iran
इराणला गेलेले तीन भारतीय नागरिक बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या बेपत्ता तीन भारतीय नागरिकांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी इराणच्या अधिकाऱ्यांसोबत सक्रियपणे काम करत असल्याचे तेहरानमधील भारतीय दूतावासाने बुधवारी सांगितले.
इराणची राजधानी तेहरानमधील भारतीय दूतावासाने जारी केलेल्या निवेदनानुसार, ''बेपत्ता नागरिकांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता असल्याबद्दल चिंता व्यक्त करत संपर्क साधला. याबाबत तीन भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांनी भारतीय दूतावासाला कळवले आहे की, त्यांच्या कुटुंबातील लोक इराणमध्ये गेल्यानंतर बेपत्ता झाले आहेत."
याची गंभीर दखल घेत भारतीय दूतावासाने इराणी सरकारकडे हा विषय जोरदारपणे निदर्शनास आणून दिला आहे. त्यांच्या ठावठिकाणाची तत्त्काळ आणि सखोल चौकशी करण्याची विनंती त्यांनी केली आहे.
"तेहरानमधील दूतावासाने इराणी अधिकाऱ्यांकडे हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला आहे. जे भारतीय नागरिक बेपत्ता झाले आहेत; त्यांचा तातडीने शोध घ्यावा आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी विनंती केली आहे," असे निवेदनात नमूद केले आहे.
अद्याप बेपत्ता व्यक्तींची ओळख उघड करण्यात आलेली नाही. पण अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की ते संबंधित कुटुंबियांच्या सतत संपर्कात आहेत आणि त्यांना घडामोडींबद्दल माहिती देत आहोत.
आम्ही दूतावासाकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांबद्दल बेपत्ता व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांनाही माहिती देत असल्याचे त्यात म्हटले आहे.