आंतरराष्ट्रीय

बेपत्ता फुटबॉल टीम सापडली पण, १ महिना गुहेतच राहणार

Pudhari News

बँकॉक : पुढारी ऑनलाईन

थायलंडमधील एका गुहेत बेपत्ता झालेल्या फुटबॉल टीमचा शोध लागला आहे. मात्र त्यांना अजून एक महिना गुहेतच रहावे लागणार असल्याचे समजते. गुहेत असलेल्या चिखल आणि पाण्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. पावसामुळे गुहेत जाणारा रस्ता खराब झाला आहे. तसेच पाण्यामुळे वाढत्या पाण्यामुळे बाहेर येणारा रस्ता बंद झाला, ज्यामुळे सगळे आतमध्ये अडकले आहेत.

बचावपथकातील कर्मचाऱ्याने स्थानिक माध्यमांना सांगितले की, फुटबॉल टीमला बाहेर काढण्यासाठी १ महिना लागू शकतो. कारण या मुलांना पोहता येत नाही. तसेच बचावकार्य अजुन सुरु आहे. मुलांना वैद्यकिय सुविधा पुरवल्या जात आहेत. गेल्या आठ दिवसांपासून अडकून पडलेले सर्वजण भूकेले आहेत.

मुलांना गुहेत शोधण्यासाठी गेलेल्या पथकाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात जेव्हा मुलांना बाहेरील कोणीतरी आले असल्याचे दिसले तेव्हा ती म्हणतात की, आम्ही उपाशी आहे. आम्ही बाहेर जाऊ शकतो का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. अधिक चौकशी केल्यानंतर एकूण १३ जण गुहेत अडकले असून ते सर्व सुरक्षित असल्याचे समजते. सर्वजण गुहेतील एका उंच जागी बसले असून सभोवताली पाणी साचले आहे. गुहेतून १६ लाख लीटर पाणी प्रतितासाला बाहेर पडत आहे. त्यामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत.

 

थायलंडमध्ये सध्या पावसाळा सुरु आहे. तो सप्टेंबर ते ऑक्टोंबरपर्यंत असणार आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय बचाव पथकाकडे पर्याय नाही. या बचावकार्यात १ हजारहून अधिक लोक काम करत आहेत.

पाणी पातळी कमी होण्यापूर्वी मुलांना बाहेर काढायचे झाले तर त्यांना किमान पोहायला शिकवणे गरजेचे आहे. तसे झाले तर त्यांना लवकर बाहेर काढता येईल. मात्र, तज्ज्ञांच्या मतानुसार असे करणे धोकादायक आहे. सर्वत्र चिखल झाला आहे. तसेच पाणी पूर्णपणे गढूळ आहे व गुहेतील वातवरणाचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होऊ शकतो.  म्हणूनच पाणी ओसरण्याची वाट पाहणे हेच उत्तम असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. या काळात त्यांच्या आरोग्याची, खाण्या-पिण्याची योग्य काळजी घेण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

गुहेत अडकलेल्या टीममधील मुलांचे वय ११ ते १६ वर्षे आहे. गुहेमध्ये बेपत्ता झाल्याची बातमी समजल्यानंतर पालक अस्वस्थ झाले होते. सोशल मीडियावर त्यांच्या बचावाची प्रार्थना जगभरातून केली जात होती. जेव्हा ती सुखरुप सापडली असल्याचे कळाले तेव्हा पालकांसह सर्वांनीच आनंद साजरा केला. आता ते लवकरात लवकर बाहेर यावेत अशी इच्छा पालकांनी व्यक्त केली आहे.

थायलंडमधील चियांग राय प्रांतातील थांम लुआंग नांग नोन गुहेत ज्युनिअर फुटबॉल टीम गेल्या आठवड्यात गेली होती. अरुंद अशा रस्त्याने ते आत गेले मात्र नंतर गुहेत पाणी वाढल्याने टीममधील मुलांसह प्रशिक्षकदेखील अडकून पडले होते. गुहेच्या प्रवेशद्वारावर खेळाडूंच्या सायकल, शूज आणि काही इतर वस्तू सापडल्यानंतर शोधमोहीम सुरु करण्यात आली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT