सिडनी; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियातील री सिडनीच्या प्रसिद्ध बोंडी बीचवर ज्यूंच्या हानुका कार्यक्रमावर दोन दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात किमान 12 जण ठार झाले आणि इतर 11 जण जखमी झाले. दरम्यान, पोलिसांनी एका दहशतवाद्यास ठार केले असून दुसरा जखमी आहे. हल्लेखोरांच्या गोळीबारानंतर सरकारने हा दहशतवादी हल्ला असल्याचे घोषित केले.
एका लहान मुलासह आणि दोन पोलीस अधिकार्यांसह 29 जण जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणावर आपत्कालीन मदतकार्य सुरू असून, जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले जात आहे. आठ दिवसांच्या ज्यू सण हानुकाच्या पहिल्या रात्री हा गोळीबार झाला. ‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’च्या वृत्तानुसार, सणाची सुरुवात साजरी करण्यासाठी समुद्रकिनार्यावर आयोजित कार्यक्रमासाठी शेकडो लोक जमले असताना हल्लेखोरांनी संध्याकाळी 6.30 वाजता (ऑस्ट्रेलियन वेळेनुसार) गोळीबार सुरू केला.
एका हल्लेखोराला पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले, तर दुसर्याला अटक करण्यात आली. संशयिताची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सिडनीच्या बोंडी बीचवरील रविवारचा गोळीबार “धक्कादायक आणि दुःखद’ असल्याचे म्हटले आहे.
‘पोलीस आणि आपत्कालीन सेवा पथके घटनास्थळी असून लोकांचे प्राण वाचवण्यासाठी कार्यरत आहेत. माझे विचार प्रत्येक पीडित व्यक्तीसोबत आहेत,’ असे अल्बानीज यांनी त्यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ‘मी परिसरातील लोकांना (न्यू साऊथ वेल्स) पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करतो,’ असेही ते म्हणाले.
ऑस्ट्रेलियाच्या बोंडी बीचवरील एक नाट्यमय व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एका नागरिकाने अंदाधुंद गोळीबारादरम्यान एका हल्लेखोरावर धाडसाने झडप घालून त्याला निष्प्रभ केले. या धाडसी कृत्यामुळे मोठी जीवितहानी टळली असण्याची शक्यता आहे. या व्हिडीओमध्ये गोंधळाच्या परिस्थितीत ती व्यक्ती हल्लेखोराला पकडून त्याच्या हातातून रायफल हिसकावून घेताना आणि शस्त्र त्याच्यावरच रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा व्हिडीओ गोळीबाराच्या आवाजाने आणि जीव वाचवण्यासाठी पळणार्या गर्दीच्या भीतीदायक वातावरणातील क्षण दाखवतो. घटनास्थळावरील दुसर्या एका व्हिडीओमध्ये, एक दुसरा शूटर उंचावरील पादचारी पुलावर उभा राहून खाली असलेल्या लोकांवर गोळीबार करत असल्याचे दिसते, तर समुद्रकिनार्यावरील लोक भीतीने सैरावैरा पळत आहेत.