Tarique Rahman Return To Bangladesh: बांगलादेशच्या राजकारणाने आज कुस बदलली. तब्बल १७ वर्षे लंडनमध्ये अज्ञातवासात राहणारे तारीक रेहमान आज बांगलादेशात परतले. त्यांच्या स्वागतासाठी ढाकाच्या रस्त्यांवर जनसागर लोटला होता. या अज्ञातवासाच्या १७ वर्षात बांगलादेशचे राजकारण कधी लोकशाही, कधी उदारमतवाद तर कधी कट्टर विचारधारेच्या हिंदोळ्यावर झुलत राहिलं.
तारीक रेहमान यांचं राजकारणाशी तसं जुनं नातं आहे. ते माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचे सुपूत्र असून त्यांनी २००८ मध्ये बांगलादेश सोडलं होतं. बांगलादेश सोडणं त्यांच्यासाठी भावूक करणारं होतं. त्यावेळी ते तत्कालीन सरकारच्या रडावर होते. त्यांच्यावर भ्रष्टाचार, लाचखोरी अन् मनी लाँड्रिंगसारखे गंभीर आरोप होते. त्यावेळी त्यांनी तत्कालीन बांगलादेश सरकारला लिखित स्वरूपात हमीपत्र आणि शपथपत्र दिलं होतं. त्यात त्यांनी देशाच्या राजकारणात पुन्हा कधी परतणार नाही अशी शपथ घेतली होती. मात्र या १७ वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आता रेहमान हे आपली शपथ तोडून बांगलादेशात परतले आहेत.
२००८ मध्ये खालिदा जिया यांना तुरूंगातून सोडून देण्यात आलं होतं. मत्र त्यांचे सुपूत्र तारीक रेहमान यांना याची मोठी किंमत मोजावी लागली होती. त्यांनी उपचारासाठी लंडनला जाण्याची परवानगी मागितली होती. त्यांना याची परवानगी मिळाली मात्र त्यांना ते बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा कधी परतणार नाहीत असं शपथपत्र द्यावं लागलं होतं.
मात्र ज्यावेळी शेख हसिनांचे सरकार तीव्र आंदोलनानंतर पडलं अन् अंतरिम सरकार अस्तित्वात आलं त्यावेळी रेहमान यांच्यावरील सर्व आरोप हटवण्यात आले. त्यांना सर्व प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आलं. तारीक रेहमान यांची आई खालिदा जिया यांची प्रकृती तशी नाजुकत असते. त्या सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. अशा परिस्थितीत बांगलादेशमधील राजकीय पोकळी भरून काढण्यासाठीचा आश्वासक चेहरा म्हणून तारीक रेहमान यांच्याकडं पाहिलं जात आहे.
८ डिसेंबर २००९ रोजी तारीक रेहमान यांना बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या ५ व्या नॅशनल काऊंसीलमध्ये वरिष्ठ व्हाईस चान्सलर म्हणून निवडण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी रेकॉर्डेड भाषणात तत्कालीन सरकारनं त्यांना अटक करून कसा त्रास दिला हे सांगितलं होतं. त्यांना मारण्याचा देखील कट रचल्याचा दावा त्यांनी केला होता.
लंडनमध्ये असलेल्या तारीक यांनी फेसबुक राजकारण सुरू केलं होतं. मात्र ते अज्ञातवासातच होते. ते लो प्रोफाईलच राहिले. ते दुरूनच पक्षाच्या कामकाजात सामील होत होते.
बांगलादेश नॅशनल पार्टीने २०१४ च्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं होतं. दरम्यान, रेहमान यांनी ब्रिटीश नागरिकत्व घेतल्याची अफवा पसरली होती. मात्र रेहमान यांनी हा दावा फेटाळला. अज्ञातवासाच्या काळात रेहमान हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत होते. मात्र राजकारणाशी जोडले गेलेले होते.